क्रशरच्या धुळीने आरोग्य धोक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

भुईंज - डोंगरातील दगडी खाणी आणि त्यावर खडी तयार करणाऱ्या क्रशरमुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे प्रदूषणात वाढ झाली असून, पाचवड व अमृतवाडी येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न झाला आहे. त्याचबरोबर पिकांवर व झाडांवर धूळ साठून शेतीलाही मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत आहे. संबंधितांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा २६ जानेवारीला आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

भुईंज - डोंगरातील दगडी खाणी आणि त्यावर खडी तयार करणाऱ्या क्रशरमुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे प्रदूषणात वाढ झाली असून, पाचवड व अमृतवाडी येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न झाला आहे. त्याचबरोबर पिकांवर व झाडांवर धूळ साठून शेतीलाही मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत आहे. संबंधितांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा २६ जानेवारीला आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

वाई, जावळी, कोरेगाव तीन तालुक्‍यांची वर्दळ असणाऱ्या पाचवड परिसरात ४०० मीटर अंतरावरील अमृतवाडीच्या डोंगररांगेमध्ये सहा ते सात क्रशर आहेत. या क्रशरपासून खडी तयार करताना निर्माण होणारी धूळ व परिसरात असणाऱ्या मातीच्या रस्त्यातून वाहतूक सुरू असताना वाऱ्याने उडणारी धूळ पाचवड परिसरात असणाऱ्या नागरी वस्तीत व शेतात पसरत आहे. त्यामळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य तयार होऊन परिसरात सुमारे एक दीड इंचाचा धुळीचा थर साचत आहे. या धुळीच्या थरामुळे शेतीतील पिके व झाडे वाळू लागली असून, नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्याची भीती वाटत आहे. या परिसरात नागरी वस्तीबरोबर शाळा व महाविद्यालय आहेत. त्यांनाही या प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. या परिसरातील क्रशर पहाटे सुरू करून रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्यामुळे परिसरात मोठे ध्वनिप्रदूषणही होत आहे. खाणीतील दगड काढण्यासाठी अनेकवेळा ब्लास्टिंग केले जात असून, ते अधिकृत परवानाधारकाकडून केले जात नसून, परवाना नसलेल्या परप्रांतीयांकडून केले जात असल्याने त्याबाबत सुरक्षिततेचे नियम पाळले जात नाहीत. 

दरम्यान, या परिसरात काम करण्यासाठी सुमारे ३५ कुटुंबे वास्तव्यास असून, त्यांना कोणत्याच सुविधा पुरविल्या जात नाहीत. परिणामी या कुटुंबांतील सर्व व्यक्ती या येथील शेतकऱ्यांच्या शेतात प्रातर्विधी करून प्रदूषणात भर घालत असतात. सध्या सर्वत्र स्वच्छ भारत अभियान सुरू असताना पाचवड परिसरात मात्र, या क्रशर मालकांनी स्वच्छतेला तिलांजली वाहिली असून, याबाबत तहसीलदार, प्रांताधिकारी मूग गिळून गप्प का आहेत, असा प्रश्न येथील शेतकरी उपस्थित करत आहेत.

२६ जानेवारीला आंदोलनाचा इशारा 
संबंधितांनी या क्रशरमालकांना ताकीद देऊन धूळ व स्वच्छतेबाबत उपाययोजना कराव्यात, अन्यथा २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा माजी सैनिक मधुकर मोरे, लक्ष्मण शेवाळे, ज्ञानोबा शेवाळे, श्रीधर शेवाळे, नारायण पवार, सूर्यकांत पवार यांनी दिला आहे.

Web Title: satara news Crush dirt health