‘डीजी’चे श्रमदान कास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

सातारा - धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील ‘फन अनलिमिटेड’ या ग्रुपच्या सुमारे ४० विद्यार्थ्यांनी कास येथे श्रमदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या विद्यार्थ्यांनी सुमारे दोन तास श्रमदान करून अनोखा आदर्श घालून दिला.

सातारा - धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील ‘फन अनलिमिटेड’ या ग्रुपच्या सुमारे ४० विद्यार्थ्यांनी कास येथे श्रमदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या विद्यार्थ्यांनी सुमारे दोन तास श्रमदान करून अनोखा आदर्श घालून दिला.

‘डीजी’ मधील सिनिअर विद्यार्थी सुशांत इंगळे व सूर्यकांत जाधव ‘सकाळ’ कार्यालयात आले होते. ‘सकाळ’ने सुरू केलेल्या श्रमदानाच्या मोहिमेत आम्हा विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घ्या, असा आग्रह त्यांनी धरला. त्यानुसार गुरुवारी सकाळी महाविद्यालयाजवळ एकत्र जमून नंतर ते एकत्रितपणे कासला पोचले. कास तलावाच्या पलीकडील तीरावर या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून सुमारे २० पोती कचरा गोळा केला. 

पाण्याच्या व कोल्ड्रिंक्‍सच्या प्लॅस्टिक बाटल्या, दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक द्रोण व पत्रावळ्या, खाद्यपदार्थांची वेष्टणे, सिगारेटची रिकामी पाकिटे, चॉकलेट व बडीशेपचे प्लॅस्टिक कागद आदी साहित्याचा या कचऱ्यामध्ये अधिक भरणा दिसून आला. या विद्यार्थ्यांना स्वच्छता मोहिमेमधील समन्वयक डॉ. दीपक निकम यांनी मार्गदर्शन केले.

निसर्गामध्ये मद्यपान करायला लोक जातात. तेथील दगडावर बसून ते जागा मिळेल तेथे दारूची बाटली फोडतात. काचेची रिकामी बाटली दगडावर फोडण्यात काय मर्दुमकी आहे, असा प्रश्‍न श्रमदानासाठी आलेले नागरिक विचारतात. कासला केवळ सातारकर कचरा करतात, हा आणखी एक मोठा गैरसमज. कासला केवळ साताऱ्यातील नव्हे तर राज्यातील व परजिल्ह्यातील पर्यटकही येतात. त्यांच्या वाहनांच्या पासिंगवरून ही गोष्ट स्पष्ट होते. त्यामुळे या पर्यटकांना कासच्या निसर्गाचा आनंद लुटायचा असेल तर त्यांना काहीतरी बंधने पाळावी लागतील. यासाठी उपाययोजना करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.

श्रमदानासाठी आवाहन 
२१ जानेवारी रोजी सुरू झालेल्या कास स्वच्छता मोहिमेने आता वेग घेतला आहे. प्रत्येक रविवारी आणि ग्रुपमधील सदस्यांची सोय लक्षात घेऊन इतरही वेळी किमान अडीच तास श्रमदान करावे, अशी अपेक्षा आहे. महिला मंडळे, उद्योग-व्यवसायातील सहकारी, तरुण मंडळे, युवा मंडळे, भिशी ग्रुप, शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी आदी या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी मोहिमेचे समन्वयक शैलेंद्र पाटील (९८८११३३०८५) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: satara news dg Labor donations kas