धूमस्टाईल बाईकर्सना  आवरणार तरी कोण? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

सातारा - धूमस्टाईलने दुचाक्‍या पळविणाऱ्यांमुळे दोन दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला नाहक जीव गमवावा लागला. त्यामुळे साताऱ्यात रात्री धुमाकूळ घालणाऱ्या या बाईकर्सना आवरणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

सातारा - धूमस्टाईलने दुचाक्‍या पळविणाऱ्यांमुळे दोन दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याला नाहक जीव गमवावा लागला. त्यामुळे साताऱ्यात रात्री धुमाकूळ घालणाऱ्या या बाईकर्सना आवरणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

रात्रीच्या वेळी साताऱ्यातील रस्त्यांचा रेसर्स ट्रॅकप्रमाणे उपयोग करण्याचे प्रकार बऱ्याच दिवसांपासून युवकांकडून सुरू आहेत. सुसाट वेगात वेडीवाकडे वळणे घेत या बाईकर्सची शहरात रेस सुरू असते. त्यामुळे रस्त्यावरून शांतपणे चाललेल्या अन्य वाहनचालकांची पंचाईत होते आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री राजन शहा हे शाहू कलामंदिरातील कार्यक्रम संपवून घरी चालले होते. या वेळी वेगात आलेल्या दुचाकीचालकाने धडक दिल्याने ते खाली पडले. डोक्‍याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अशा प्रकारच्या घटना साताऱ्यात यापूर्वीही घडल्या आहेत. अनेकांच्या जिवावर बेतले आहे. तर, काहीजण जखमी झाले आहेत. गाड्यांच्या रेसची हौस कोणाच्या तरी जिवावर उठतेय, याचे भानही या दुचाकीस्वारांना नसते. मात्र, त्यामुळे एखाद्याचे संपूर्ण कुटुंब उद्‌ध्वस्त होत आहे. माणसांबरोबरच प्राण्यांनाही या बाईकस्वारांच्या वेगाचा फटका बसलेला आहे. 

वाहतूक शाखेलाही या बाईकर्सच्या प्रकाराची माहिती आहे. त्यामुळे अधूनमधून रात्रीच्या वेळी वाहनांची तपासणी होत असते. त्या वेळी हे युवक रस्त्यावर धुमाकूळ घालत नाहीत. तपासणी मोहीम थंडावली की यांच्या गाड्यांना पुन्हा वेग येत आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी सातारचे रस्ते प्रामुख्याने राजपथ धोकादायक बनत आहे. अनेकजण गर्दीच्या वेळीही आपले वाहन चालविण्याचे कौशल्य आजमावण्यात दंग असतात. अनेकदा दोन-तीन वाहनांना धडक देऊन हे निघून जातात. ठोस कारवाई होत नसल्यामुळे या बाईकर्सचे फावत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी "धूमस्टाईल'ने वाहने चालविणाऱ्यांवर वाहतूक शाखेने कडक कारवाई करणे आवश्‍यक आहे.

Web Title: satara news dhoom style bikers

टॅग्स