किराणा दर स्थिर राहिल्याने दिवाळी गोड! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

सातारा - साखरेच्या गोडीला दरवाढीचा किंचित कडवटपणा असला तरी डाळींसह इतर किरणा मालाचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहेत. "जीएसटी'चा फटका तयार फराळाच्या पदार्थांना फारसा बसलेला नाही. यामुळे नागरिकांची दिवाळी उत्साहातच होणार आहे. मात्र, अधूनमधून वाढत असलेला पावसाचा जोर अन्‌ शेतात अडून राहिलेली कामे यामुळे किराणा दुकानात गच्च माल भरलेल्या व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा सध्यातरी करावी लागत आहे. 

सातारा - साखरेच्या गोडीला दरवाढीचा किंचित कडवटपणा असला तरी डाळींसह इतर किरणा मालाचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहेत. "जीएसटी'चा फटका तयार फराळाच्या पदार्थांना फारसा बसलेला नाही. यामुळे नागरिकांची दिवाळी उत्साहातच होणार आहे. मात्र, अधूनमधून वाढत असलेला पावसाचा जोर अन्‌ शेतात अडून राहिलेली कामे यामुळे किराणा दुकानात गच्च माल भरलेल्या व्यापाऱ्यांना ग्राहकांची प्रतीक्षा सध्यातरी करावी लागत आहे. 

महागाईचा कितीही कडेलोट झाला तरीही दिवाळीचे फराळ हौसेने प्रत्येक घरात केले जातात. यावर्षी तर फराळांच्या कच्च्या मालात गेल्या वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी स्वस्ताई आहे. तर काही मालांचे दर स्थिर आहेत. किमान दिवाळीच्या तोंडावर किराणा मालाचे दर स्थिर राहिल्याने लाडू नागरिकांना गोडच लागणार आहेत. डाळी आणि तेलाचे दर किंचित कमी झाले आहेत. हरभरा डाळ साधारण 80 ते 90 रुपये किलो दराने विकली जात आहे. तर सोयाबीन रिफाइंड तेलही 70 ते 75 रुपये किलोने विकले जात आहे. इतर रवा, मैदा, कच्चे पोहे, भाजका पोहा, खोबरे अशा विविध किराणा मालाचे दर सुमारे 15 ते 20 टक्के कमी असल्याची माहिती येथील किराणा मालाचे होलसेल व्यापारी गुरुप्रसाद सारडा यांनी दिली. 

बाजारपेठेत आता मिठाईच्या दुकानांत दिवाळीच्या फराळाचे सर्व पदार्थ तयार मिळतात; पण खरी सुगरण कधीच किमान दिवाळीत तरी विकतचे पदार्थ घरात खायला घालत नाही. त्यासाठी त्या दिवाळीपूर्वी चार दिवस स्वतः राबतात. आपल्या हाताने केलेले पदार्थ आपल्या माणसांना खाऊ घालण्यात गृहिणींना आगळा आनंद मिळतो. त्यामुळे हळूहळू आता दिवाळीच्या तोंडावर किराणामालाच्या दुकानांत ग्राहकांची वर्दळ वाढू लागली आहे. 

दरम्यान, तयार मिठाई व फराळांच्या पदार्थांना "जीएसटी' करांचे वेगवेगळे प्रमाण आहे. मात्र, एकूणच कच्चा मालाच्या उतरलेल्या दरामुळे गेल्यावर्षीएवढेच दर राहणार आहेत. वाढलेल्या मजुरीचा काहीसा परिणाम होण्याची शक्‍यता असल्याची माहिती फराळाचे तयार पदार्थ विक्रेत्यांनी दिली. 

घरगुती पदार्थ विकत घेण्याकडे कल!  
अनेक व्यावसायिक, उद्योजक व नोकरदार महिलांना फराळाचे पदार्थ करण्यास वेळ मिळत नाही. अशा महिला मिठाईच्या दुकानांतून तयार पदार्थ विकत घेतात. साताऱ्यात अनेक महिला दिवाळीचे फराळाचे पदार्थ तयार करून विकण्याचा घरगुती व्यवसाय करतात. अशा शंभरावर महिला साताऱ्यात असून, त्यांच्याकडून पदार्थ विकत घेण्यास अनेक कुटुंबे प्राधान्य देतात. 

किराणा मालाचे सर्वसाधारण दर (प्रति किलो रुपयांत) 
हरभरा डाळ 80 ते 90, बेसन 90 ते 100, साखर 35 ते 40, पोहे 40, भाजके पोहे 55 ते 60, खोबरे 160, मैदा 25, रवा 26, किरकोळ एक किलो पॅक सोयाबीन तेल-70 ते 75.

Web Title: satara news diwali festival