पालखी सोहळ्याचे यंदा जिल्ह्यात चार मुक्‍काम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

फलटण - आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या श्री संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळ्याचे यावर्षी सातारा जिल्ह्यात चार मुक्‍काम असून, लोणंद येथे या वेळी एकच मुक्‍काम आहे. आषाढी वारीतील पहिले उभे रिंगण १४ जुलै रोजी लोणंद- तरडगाव मार्गादरम्यान चांदोबाचा लिंब येथे होणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पालखी मार्ग व मुक्‍कामाच्या ठिकाणांची पाहणी आळंदी देवस्थान प्रमुख, सोहळा प्रमुख, पालखीच्या मालकांसह प्रमुख विश्‍वस्तांनी करून संबंधित यंत्रणेला योग्य त्या सूचना केल्या आहेत. 

फलटण - आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या श्री संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळ्याचे यावर्षी सातारा जिल्ह्यात चार मुक्‍काम असून, लोणंद येथे या वेळी एकच मुक्‍काम आहे. आषाढी वारीतील पहिले उभे रिंगण १४ जुलै रोजी लोणंद- तरडगाव मार्गादरम्यान चांदोबाचा लिंब येथे होणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पालखी मार्ग व मुक्‍कामाच्या ठिकाणांची पाहणी आळंदी देवस्थान प्रमुख, सोहळा प्रमुख, पालखीच्या मालकांसह प्रमुख विश्‍वस्तांनी करून संबंधित यंत्रणेला योग्य त्या सूचना केल्या आहेत. 

जिल्ह्यात यावर्षी पालखी सोहळा १३ जुलै रोजी नीरा नदी ओलांडून पाडेगाव येथे प्रवेश करणार आहे. तेथे जिल्ह्याच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. लोणंदला १३ जुलै, तरडगावला १४ जुलै, फलटणला १५ जुलै आणि बरडला १६ जुलै असे चार मुक्‍काम सातारा जिल्ह्यात आहेत. लोणंदचा एक दिवसाचा (१३ जुलै) मुक्‍काम संपवून सोहळा फलटण तालुक्‍यात १४ जुलै सरहद्द ओढा ओलांडल्यावर प्रवेश करणार आहे. त्याचदिवशी दुपारी चार वाजता चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण होणार आहे.

तरडगावचा पालखी तळ गावाच्या पूर्वेला प्रशस्त जागेत असल्याने वारीतील दिंड्यांच्या मुक्‍कामांचा फारसा प्रश्‍न उद्‌भवत नाही. १४ चा तरडगावचा मुक्‍काम संपल्यानंतर पालखी सोहळा १५ रोजी सकाळी आठ ते नऊ या वेळेत काळज येथील दत्त मठात परिसरातील भाविकांच्या दर्शनासाठी थांबणार आहे. तेथून पुढे मजल दरमजल करीत सुरवडी येथे थोडा वेळ थांबून दुपारच्या जेवणासाठी सोहळा निंभोरे येथे विसावणार आहे. तेथून दोन तासांच्या विश्रांतीनंतर सोहळा फलटणकडे मार्गस्थ होणार असून, शहराच्या जिंती नाक्‍यावर सोहळ्याचे नगरपालिकेतर्फे स्वागत करण्यात येणार आहे.

शहरातील प्रमुख मार्गावरून सोहळा १५ रोजी विमानतळावर विसावणार आहे. एक दिवसाचा फलटणचा मुक्‍काम संपवून सोहळा १६ रोजी बरड मुक्‍कामाकडे मार्गस्थ होईल. फलटण येथील मुक्‍काम संपवून सकाळी सहा वाजता बरडकडे निघणारा संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळा सकाळी आठ वाजता विडणी येथे न्याहरीसाठी थांबणार असून, दुपारच्या जेवणासाठी पिंप्रद येथे विसावणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता बरड मुक्‍कामी पोचेल, असे सोहळ्यातील प्रमुख विश्‍वस्तांनी सांगितले. पालखी सोहळ्यातील सर्वात कमी अंतराचा प्रवास लोणंद ते तरडगाव असा असल्याने लोणंद येथून सोहळा दुपारी साडेबारानंतर निघणार आहे.  

पालखी वारीचा मार्ग व मुक्‍कामाच्या ठिकाणांच्या सोईसुविधा पाहण्यासाठी सोहळा प्रमुख विकास ढगे- पाटील, प्रमुख विश्‍वस्त अभय टिळक, पालखीचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार अशा सर्व मंडळींनी संबंधित गावांना भेटी देऊन पालखी मुक्‍कामाच्या ठिकाणांची पाहणी करून पाणी, वीज आदी बाबींची माहिती घेतली.

अधिकमासामुळे सोहळा महिनाभर पुढे 
अधिकमास आल्यामुळे या वर्षी पालखी सोहळा एक महिनाभर पुढे गेलेला आहे, तसेच तिथीचा क्षय असल्यामुळे लोणंदला मुक्‍काम एक दिवसाचा झाल्याचे संबंधितांनी सांगितले.

Web Title: satara news dnyaneshwar maharaj palkhi sohala stay