ग्रामीण रुग्णालयच डॉक्‍टरविना  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

दहिवडी - माण तालुक्‍याच्या मुख्य ठिकाणी असणाऱ्या दहिवडी ग्रामीण रुग्णालयाची अवस्था सलाईनवरच आली आहे. या ठिकाणी तीन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर असताना केवळ एक जागा भरली गेली होती. चार ते पाच वर्षे फक्त एकच वैद्यकीय अधिकारी २४ तास काम करत होते. त्यांचीही प्रशासनाने बदली केली आहे. त्यानंतर या ठिकाणी कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. 

रुग्णालयात सर्व सुविधा, सामग्री उपलब्ध आहे. मात्र, कर्मचारी, डॉक्‍टरच नाहीत, अशी अवस्था आहे. मागील महिन्यात आमदार जयकुमार गोरे यांनी ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागांसंदर्भात पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार, असे जाहीर केले होते. रुग्णालयातील ‘क्ष’ किरण मशिन उद्‌घाटन समारंभात आमदारांनी हे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर रिक्त जागा भरण्याचे सोडाच सध्या कामावर असलेल्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या होत आहेत. त्यामुळे रिक्त जागांचा आकडा वाढतच आहे. त्यातून रुग्णांबरोबरच ग्रामीण रुग्णालयही सलाईनवर आले आहे.  वैद्यकीय अधिकारी डॉ. हनगंडी यांची सेवानिवृत्ती अवघ्या आठ महिन्यांवर आली असताना त्यांची बदली पाटण येथे करण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार सेवानिवृत्तीसाठी एक वर्ष असताना विनंती बदली करावी अन्यथा करू नये, या नियमाचे पालनदेखील करण्यात आले नाही. डॉक्‍टर निवास व कर्मचारी (वर्ग ३) यांच्यासाठी नवीन इमारत बांधून तयार आहे. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जागाच रिक्त असल्याने नवीन इमारतीदेखील मोकळ्या पडल्या आहेत. 

रिक्त जागा न भरताच डॉक्‍टरांची बदली होते तसेच सुविधा उपलब्ध असतानादेखील कर्मचारी का भरले जात नाहीत, लोकप्रतिनिधी गप्प कसे बसतात? आदी प्रश्‍न नागरिक उपस्थित करत आहेत.

एकूण सहा पदे रिक्त
दहिवडीतील ग्रामीण रुग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. त्यामध्ये अधिपरिचारिका- १, प्रयोगशाळा सहायक- १, कक्ष सहायक- ३, वाहनचालक- १ अशी एकूण सहा पदे रिक्त आहेत. त्यातच आता वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे असताना एकही अधिकारी कामावर नाही.

Web Title: satara news doctor hospital