डॉक्‍टर अन्‌ औषधांची टंचाई पाचवीला पूजलेली

हेमंत पवार
सोमवार, 17 जुलै 2017

सातारा जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यात सुरू असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे ही वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता, त्यामुळे त्यांच्यावर येणारा कामाचा अतिरिक्त ताण, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्‍न, औषधांचा अभाव, तेथे मिळणारे उपचार, रुग्णांना दिली जाणारी वागणूक, सोयी-सुविधांचा अभाव या ना अशा अनेक कारणांनी गावोगावी चर्चेचा विषय बनली आहेत. त्यांचा मागोवा घेणारी वृत्तमालिका आजपासून... 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील ७१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ४०० आरोग्य उपकेंद्रांमार्फत, ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, ज्यांना खासगी दवाखान्यात जावून आरोग्य सेवा घेणे परवडत नाही, अशा सर्वसामान्य कुटुंबांतील आबालवृध्दांना आरोग्य सेवा देण्याचे काम 

सुरू आहे. संबंधित केंद्रातून येत असलेल्या सेवेमुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत मागील दोन वर्षांत आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांच्या सेवेसाठी प्रत्येक आरोग्य केंद्रात १५२ डॉक्‍टरांची पदे, कर्मचारी असा स्टाफ मंजूर आहे. मात्र, सध्या जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३४ हून अधिक पदे रिक्त आहेत. तीच स्थिती कर्मचाऱ्यांचीही आहे. ३१ मे रोजी अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळेही अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. अनेक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांत सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळेही मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा स्थितीत आरोग्य सेवा देतानाही त्यांच्यावर मर्यादा येवू लागल्या आहेत. त्याच कर्मचाऱ्यांत काम करून घेवून आरोग्य विभागाच्या योजना सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोचवून जिल्ह्यात प्रत्येक तालुक्‍यात काही आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे चांगली कामगिरी करत आहेत. त्यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने गौरवही करण्यात आला आहे. त्यांचा अपवाद वगळता अन्य काही आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शोधण्याची वेळ रुग्णांवर येत आहे. काही ठिकाणी एकच डॉक्‍टर असल्याने सायंकाळी रुग्णांना वैद्यकीय अधिकारी भेटत नसल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने त्यांच्यावर येणारा कामाचा 

अतिरिक्त ताण याचाही विचार वरिष्ठांकडून केला जात नसल्याचे दिसत आहे.  मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी यापूर्वी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. काही ठिकाणी तर महिलांची प्रसूतीच रस्त्यावर, आरोग्य केंद्राच्या आवारात झाल्याची उदाहरणे घडली आहेत. त्यामुळे तेथील अनास्था चव्हाट्यावर आली होती. त्याचबरोबर काही प्राथमिक आरोग्य केंद्रांत तर जुजबी उपचार करून रुग्णांना पुढील उपचारासाठी अन्यत्र पाठवण्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर अनेकदा कामाच्या येणाऱ्या ताणामुळे आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रुग्णांना चांगली वागणूही देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेही दररोज वादावादीचे प्रसंग होत आहेत. यासह अन्य कारणांमुळे आरोग्य केंद्राची ‘ट्रीटमेंट’ चर्चेत आली आहे.

भरतीसाठी ‘डॉक्‍टर’च फिरकेनात! 
आरोग्य विभागामध्ये डॉक्‍टरांच्या भरतीसाठी एमबीबीएस डॉक्‍टरांची भरती काढण्यात आली होती. त्यासाठी केवळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच अर्ज आल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली. खासगी आरोग्य सेवेतून जादा पैसे मिळत असल्याने आणि त्यांना त्यासाठी वेळेचेही बंधन नसल्याने शासनाच्या आरोग्य विभागात कामासाठी एमबीबीएस डॉक्‍टरच येईनात, अशी स्थिती असल्याने गेल्या काही वर्षांपासून डॉक्‍टरांची पदे रिक्तच राहिली आहेत.  

Web Title: satara news doctor medicine