गर्भलिंग चाचणीप्रकरणी दोन डॉक्‍टर जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

काशीळ - येथील डॉ. सिकंदर आदम शेख आणि शाहूपुरी (सातारा) येथील डॉ. अशोक गुंडू पाटील हे दोघे पुन्हा एकदा गर्भलिंग निदान कायद्यान्वये बोरगाव पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. याबाबत या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

काशीळ - येथील डॉ. सिकंदर आदम शेख आणि शाहूपुरी (सातारा) येथील डॉ. अशोक गुंडू पाटील हे दोघे पुन्हा एकदा गर्भलिंग निदान कायद्यान्वये बोरगाव पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. याबाबत या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

पोलिसांकडून व सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी वाई येथील एका दांपत्याने येथे अनधिकृतरीत्या गर्भलिंग तपासणी करून अकलूज (सोलापूर) येथे गर्भपात केल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांच्या सहकार्याने संबंधित दांपत्य शोधून काढून हे प्रकरण बाहेर काढले होते. या संदर्भात अधिक माहिती घेता या रॅकेटची पाळेमुळे शाहूपुरी, काशीळ व अकलूज येथे असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी बुधवारी एका अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून बनावट केस उभी करून शाहूपुरी येथील डॉ. अशोक पाटील याच्याकडे पाठवली. तेथे गर्भलिंग तपासणीसाठी 15 हजार रुपये सौदा झाल्यावर संबंधित दांपत्याला दुपारी काशीळ येथील डॉ. सिकंदर शेख याच्याकडे पाठविण्यात आले. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, ऍड. वर्षा देशपांडे, तसेच शाहूपुरी व बोरगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी काशीळ परिसरातच थांबले होते. 

सिकंदर शेख याच्या राहत्या घरात संबंधित महिलेची गर्भलिंग चाचणी केल्यानंतर या पथकाने त्याला व डॉ. अशोक पाटील या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी डॉ. अशोक पाटील याची रेनॉल्ड कंपनीची चारचाकी गाडीही ताब्यात घेतली आहे. 

रात्री उशिरापर्यंत या घटनेची फिर्याद दाखल करण्याचे काम बोरगाव पोलिस ठाण्यात सुरू होते. या सर्व घटनेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या ऍड. वर्षा देशपांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, आरोग्य विभागाच्या कायदेशीर सल्लागार ऍड. पूनम साळुंखे, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. एम. धुमाळ, पोलिस निरीक्षक सी. एस. बेदरे, कर्मचारी बालम मुल्ला, धनंजय कुंभार, स्वप्नील कुंभार, महिला पोलिस प्रीती माने, भोसले, चालक गिरीश रेड्डी, तसेच बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी, जवान किरण निकम, राजू शिखरे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. 

दोघांवर यापूर्वीही गुन्हे 
डॉ. सिकंदर शेख याच्या विरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात यापूर्वीही जुलै 2012 मध्ये असाच गुन्हा दाखल झाला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, शेख हा जामिनावर सुटला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर उंब्रज पोलिस ठाण्यातही असाच गुन्हा दाखल असून, त्याप्रकरणी तो उंब्रज पोलिसांना हवा असल्याचे समजले. या घटनेतील दुसरा डॉक्‍टर अशोक पाटील याच्याही विरोधात सातारा पोलिस ठाण्यात असाच गुन्हा दाखल आहे. 

Web Title: satara news doctor Pregnancy Test