लोकसहभागातून गावांचे परिवर्तन शक्‍य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

लोकसहभागामुळे गावांचे परिवर्तन होते. तेथे शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. जेवढे लोक योजनेशी जोडले जातील, तेवढा योजनांचा लाभ मिळतो आणि तो इतरांना अनुकरणीय असतो. त्यासाठी प्रत्येक गावात लोकचळवळ उभी राहिली पाहिजे. शासनाच्या प्रत्येक योजनेत सातारा जिल्हा परिषद आदर्श ठरेल असे ‘टीम वर्क’ करू, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘कॉफी वुईथ सकाळ’ उपक्रमात बोलताना दिली.

दै. ‘सकाळ’च्या कार्यालयात झालेल्या ‘कॉफी वुईथ सकाळ’ उपक्रमात ते बोलत होते. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून लोककल्याणाच्या योजना राबविता येतात. मी अतिशय भाग्यवान आहे, की मोठी परंपरा, इतिहास असलेल्या जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली. ती संधी सार्थ करण्याचा प्रामाणिक, कसोशीने प्रयत्न करणार आहे, अशी हमीही त्यांनी दिली. त्यांच्याशी झालेली बातचीत...

टेक्‍नॉलॉजीमुळे पारदर्शकतेत वाढ
चौदाव्या वित्त आयोगातून थेट ग्रामपंचायतींना विकासकामांचा निधी मिळत असल्याने जिल्हा परिषदेची ताकद कमी झाली, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे विकास प्रक्रियेतील विलंब कमी झाला. गावे स्वयंपूर्ण करू तेवढी विकासाची गती वाढेल. शासन प्रत्येक योजनेला टेक्‍नॉलॉजीची जोड देत आहे. पंतप्रधान आवास योजनेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान दिले जाते. टेक्‍नॉलॉजीतून पारदर्शकता वाढत आहे. व्यक्‍ती हस्तक्षेप कमी होईल तेवढी पारदर्शकता येण्यास मदत होईल. बांधकाम विभागातील ठेकेदारांचा थेट संबंध येऊ नये, यासाठी ‘आरटीजीएस’ प्रणालीद्वारे थेट खात्यावर रक्‍कम जमा केली जात आहे.

योजना अंमलबजावणीत अव्वल
विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांच्या संकल्पनेतील ‘झिरो पेंडन्सी’ उपक्रमात सातारा राज्यात प्रथम आहे. प्रशासकीय कामकाज अधिक गतीने पूर्ण केले जात असल्याने त्याचा फायदा जलस्वराज टप्पा क्रमांक दोनमध्ये झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १७१ योजनांचे ई-भूमिपूजन केले. त्यापैकी २४ योजना जिल्ह्यातील होत्या. त्यापोटी २२ कोटींचा निधी मिळाला. दर महिन्याला बैठक, दररोज पाठपुरावा करून जास्त प्रस्ताव पाठविले, त्यामुळे हे यश मिळाले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत जिल्हा परिषदेने १३० टक्‍के मनुष्यदिनांची निर्मिती केली आहे. जिल्हा ग्रामविकास निधीतून साठलेली व्याजाची चार कोटी ७० लाखांची रक्‍कम नुकतीच ग्रामपंचायतींना वितरित केली आहे. त्यातून संबंधित ग्रामपंचायतीत विकासकामे मार्गी लागतील.

आरोग्य विभागात चांगले काम
आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान प्रभावीपणे राबविले. इंडियन मेडिकल असोसिएशनअंतर्गत स्त्रीरोग संघटनेतील डॉक्‍टरांशी चर्चा करून त्यांना या अभियानात जोडले. पहिल्यांदा झालेल्या शिबिरात केवळ ५८५, तर गत महिन्यात दोन हजार ४११ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. ४५ आरोग्य केंद्रांत हे खासगी स्त्रीरोग तज्ज्ञ महिन्यातून एक दिवस गरोदर मातांची तपासणी करण्यास जातात. त्यातून अतिजोखमीच्या मातांवर उपचारही होत आहेत. कर्करोगांचे प्रमाण वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी ‘कॅन्सर साक्षर सातारा’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात अँको लाइफ सेंटर, कृष्णा चॅरिटेबल, शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने २५ शिबिरांद्वारे दोन हजारांपेक्षा जास्त लोकांची तपासणी केली. आरोग्य उपकेंद्रातील रिक्‍त जागांचा अडसर दूर करण्यासाठी बीएएमएस, बीएचएमएस डॉक्‍टर नेमून त्यासाठी सेस फंडातून निधी दिली जात आहे. आरोग्य केंद्राच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 दै. ‘सकाळ’शी घट्ट नाते
‘सकाळ’शी भावनिक, कौटुंबिक नाते आहे. विकास, परिवर्तनाच्या बाबींवर अनेकदा प्रतापराव पवार, अभिजित पवार यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘सकाळ’ परिवारात येण्याचा आनंद वाटतो, असेही सांगत डॉ. देशमुख यांनी ‘सकाळ’शी असलेले घट्ट नाते स्पष्ट केले.

Web Title: satara news dr rajesh deshmukh