अफगाणचे ड्रायफ्रूट अन्‌ पंजाबच्या शेवया

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

सातारा - शिरखुर्म्यासाठी काजू, बदाम, पिस्ते, चारोळी अन्‌ बनारसी, पंजाबी शेवया... इफ्तारसाठी सौदी अरेबियाचे खजूर आणि नानाविध पदार्थ... सामिष भोजनासह भरजरी कपडे... डोळ्यांना थंडावा देणारा सुरमा... सुगंधी अत्तर यांसारख्या विविध वस्तूंनी रमजाननिमित्त बाजारपेठ सजली आहे.

सातारा - शिरखुर्म्यासाठी काजू, बदाम, पिस्ते, चारोळी अन्‌ बनारसी, पंजाबी शेवया... इफ्तारसाठी सौदी अरेबियाचे खजूर आणि नानाविध पदार्थ... सामिष भोजनासह भरजरी कपडे... डोळ्यांना थंडावा देणारा सुरमा... सुगंधी अत्तर यांसारख्या विविध वस्तूंनी रमजाननिमित्त बाजारपेठ सजली आहे.

बाजारात खरेदीसाठी मुस्लिम धर्मीयांबरोबरच अन्य नागरिकांची गर्दी होत आहे. रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांची विविध पदार्थ, ड्रायफ्रूट, कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत वर्दळ वाढली आहे. नानाविध टोप्यांसह तसबिरी विक्रीस आल्या आहेत. पहाटेपासूनच्या नमाज पठणांसाठी मुस्लिम धर्मीयांची विविध मशिदींमध्ये गर्दी होत आहे. बाजारपेठेतील वस्तूंबाबत विक्रेते अ. शकुर अ. करीम अँड सन्सच्या वतीने माहिती देण्यात आली.

ते म्हणाले, ‘‘बहुतेक डॉयफ्रूट हे परदेशातील आहेत. ते अगदी शेवयांसह आम्ही मुंबई बाजारपेठेतून मागवितो.’’ साताऱ्यात मुंबई आणि बनारस, राजस्थान, पंजाब येथून शेवया येतात. शिरखुर्म्याकरिता खोबरे, मनुके, आक्रोड, केशर, शुद्ध तुप, बदाम, पिस्ता, चारोळी, काजू, वेगवेगळ्या प्रकारचे इसेन्स्‌ तर बिर्याणीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या खजूरही विविध दुकानातून उपलब्ध झाले आहेत. काजूचा दर ९६० रुपये किलो, तर २७०० रुपये किलोने पिस्ता आहे. चारोळे ९०० रुपये, तर खारीक १३० रुपये किलोने विकली जात आहे. शेवई ५० ते ७० रुपये किलो, आक्रोड ९०० रुपये तर उत्तम प्रकारची खजूर ७० ते १४० रुपये किलोने सध्या विकली जात आहे. 

देशी, परदेशी बनावटीच्या सुरम्याला रमजानमध्ये आवर्जून मागणी असते. स्त्रिया आणि पुरुषांसाठी निरनिराळ्या प्रकारचा सुरमा, अत्तरही विविध दुकानांतून उपलब्ध झाली आहेत. दरम्यान, खण आळीसह शहरात सर्वत्र कापड दुकानांतून रमजान सणाच्या कपडे खरेदीसाठी मुस्लिम महिलांसह आबालवृद्धांची वर्दळ वाढली आहे. 

Web Title: satara news Dryfruit of Afghan