शिक्षण विभागापुढे ‘टॉप’चे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

सातारा - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रथम संकलित मूल्यमापन चाचणीत राज्यात द्वितीय, दुसऱ्या चाचणीत राज्यात प्रथम स्थानावर आलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागापुढे आता येत्या चाचणीत ‘टॉप’वर राहण्याचे आव्हान उभे आहे. ही परीक्षा आठ ते ११ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. 

सातारा - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रथम संकलित मूल्यमापन चाचणीत राज्यात द्वितीय, दुसऱ्या चाचणीत राज्यात प्रथम स्थानावर आलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागापुढे आता येत्या चाचणीत ‘टॉप’वर राहण्याचे आव्हान उभे आहे. ही परीक्षा आठ ते ११ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. 

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन एक चाचणी यंदा दिवाळीनंतर होईल. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी २०१७-१८ या वर्षात तीन शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन केले जाणार आहे. विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी राज्याने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. संकलित मूल्यमापन चाचणी एक ही राज्यस्तरावरून घेतली जाणार आहे. त्यासाठी शाळा त्यांच्या स्तरावर स्वतंत्र प्रश्‍नपत्रिका काढून मूल्यमापन करू शकतात किंवा राज्यस्तरावरून होणाऱ्या संकलित मूल्यमापन एक चाचणीद्वारे मूल्यमापन करू शकतात. शाळा स्तरावर स्वतंत्र चाचणी घ्यायची किंवा नाही तसेच दोन्हीपैकी कोणत्या चाचणीचे गुण शाळास्तरावरील मूल्यमापनासाठी गृहित धरायचे, याचा निर्णयही शाळांवर सोपवला आहे. 

विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या प्रश्‍ननिहाय नोंदीसाठी ॲपमध्ये राज्यस्तरावरून घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी एकचे गुण भरावे लागतील. ज्या विषयांची चाचणी राज्यस्तरावरून घेण्यात येणार नाही, अशा विषयांची चाचणी शाळांनी त्यांच्या स्तरावर स्वतंत्रपणे आयोजित करावी. मूल्यमापन चाचणी एक वेळेप्रमाणेच होईल. मात्र, चाचणीतील तोंडी प्रश्‍न, प्रात्यक्षिक इतर दिवशी घेता येईल. उत्तरपत्रिकांची तपासणी ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून ऑनलाइन/ ऑफलाइन पद्धतीने गुण भरले जावेत. चाचणीच्या प्रश्‍नपत्रिका गोपनीय राहतील, याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. 

बदल्यांचा परिणाम?
शिक्षक बदल्यांमुळे सध्या शिक्षण क्षेत्रात अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. बहुतांश शिक्षकांचे अध्यापनापेक्षा बदल्यांकडे लक्ष लागून आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असल्याची चिंता व्यक्‍त होत आहे. ऐन चाचणीच्या कालावधीतही बदल्या सुरू झाल्यास त्याचा परिणाम दिसून येईल.

चाचणीचे वेळापत्रक 
पहिली ते आठवी- प्रथम भाषा ( आठ नोव्हेंबर, सकाळी ११ ते १), 
पहिली ते आठवी- गणित (नऊ नोव्हेंबर, सकाळी ११ ते १), 
तिसरी ते आठवी- इंग्रजी (दहा नोव्हेंबर, सकाळी ११ ते १), 
सहावी ते आठवी- विज्ञान (११ नोव्हेंबर, सकाळी ११ ते १).

Web Title: satara news education department