साताऱ्यात ‘कर्जमुक्ती’साठी एल्गार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

‘किसान क्रांती’सह सर्व शेतकरी संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 
सातारा - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे या प्रमुख मागणीसह शेतमालाला हमीभाव, निवृत्ती वेतन, तसेच इर्मा कायदा लागू करावा आदी मागण्यांसाठी आज ‘किसान क्रांती’सह सर्व शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, उद्यापासून (गुरुवार) राज्यातील शेतकरी बेमुदत संपावर जाणार असल्याचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.

राज्यातील शेतकरी एक जूनपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर किसान क्रांती व सर्व शेतकरी संघटनांनी आज पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. मोर्चात शेतकऱ्यांनी बैलगाड्या, मेंढर, तसेच ट्रॅक्‍टर आणले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी मोर्चा अडविला. मोजक्‍याच प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात सोडण्यात आले. त्यानंतर डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालाला स्वामिनाथन आयोगाप्रमाणे हमीभाव, ठिबक सिंचन व तुषार संचासाठी अनुदान, शेतकऱ्यांसाठी निवृत्तिवेतन, दुधाला सुमारे ६० रुपये लिटर भाव, कृषिपंपाला मोफत वीज मिळण्यासाठी शेतकरी बेमुदत संपावर जाणार आहेत. या संपास शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी कृती बचाव समिती, महाराष्ट्र किसान सभा, अन्नदाता शेतकरी संघटना, तसेच राज्यातील इतर संघटनांनी पाठिंबा दिला आहे.’’  

दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. त्या वेळी शंकरराव गोडसे, शंकर शिंदे, पंजाबराव पाटील, सुनील काटकर, धर्मराज जगदाळे, विकास जाधव, ॲड. कमल सावंत, गीतांजली कदम, नगरसेविका स्नेहा नलवडे, धनश्री महाडिक, परवीन पानसरे, कल्पक जाधव यांच्यासह विविध तालुक्‍यांमधील शेतकरी व शेतीसंबंधित संघटना आणि संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निषेध 
किसान क्रांती मोर्चाचे निवेदन देण्यासाठी मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. त्या वेळी कार्यालयीन कामकाजानिमित्त जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल या बाहेर असल्याची माहिती मिळताच, मोर्चेकरी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या कक्षाकडे गेले. तेही कक्षात नव्हते. त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निषेध करून सरकारनेच अधिकाऱ्यांना थांबू नका, असा आदेश दिल्याची शंका व्यक्त केली.

Web Title: satara news elgar for loanfree