उद्दिष्टाच्या ६३ टक्के पीककर्ज वाटप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

काशीळ - सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात उद्दिष्टाच्या ६३ टक्के पीककर्ज बॅंकांकडून वितरित करण्यात आले आहे. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आघाडी घेतली असून, या बॅंकेने उद्दिष्टाच्या ९३ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांमध्ये पीक कर्ज वितरणाबाबत अनास्था दिसून येत असून, या बॅंकांनी उद्दिष्टाच्या निम्मेही  वाटप केलेले नाही.   

काशीळ - सातारा जिल्ह्यात खरीप हंगामात उद्दिष्टाच्या ६३ टक्के पीककर्ज बॅंकांकडून वितरित करण्यात आले आहे. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने आघाडी घेतली असून, या बॅंकेने उद्दिष्टाच्या ९३ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांमध्ये पीक कर्ज वितरणाबाबत अनास्था दिसून येत असून, या बॅंकांनी उद्दिष्टाच्या निम्मेही  वाटप केलेले नाही.   

खरीप हंगामासाठी जिल्ह्याला एक हजार ६५० कोटी १५ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. या वर्षी एप्रिल ते सप्टेंबरअखेर खरीप पेरण्यांचा कालावधी धरला आहे. आतापर्यंत दिलेल्या उद्दिष्टाच्या ६३ टक्के वाटप झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. बॅंकनिहाय हेच आकडे पाहता कर्जवाटपाची टक्केवारी कमी होते. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेशी व त्यानंतर बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, स्टेट बॅंकेशी जोडलेले आहेत. 

खरिपात आतापर्यंत पेरणी झालेल्या पिकांची परिस्थिती चांगली असून, पीक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पीक कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती बॅंक आघाडीवर असून, या बॅंकेस या हंगामात ८१० कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी या बॅंकेने ७४९.६५ कोटींचे वाटप केले असून, ९३ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रला १४१ कोटी ४२ लाखांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ७९.५० कोटींचे वाटप करत उद्दिष्टाच्या ५६ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने १५९ कोटी ९० लाखांच्या उद्दिष्टापैकी ३०.६१ कोटींचे वाटप केले आहे. 

बॅंक ऑफ इंडियाने १४२ कोटी १४ लाखांच्या उद्दिष्टापैकी २०.९९ कोटींचे वाटप केले आहे. आयडीबीआय बॅंकेने ८८ कोटी ८३ लाख उद्दिष्टापैकी ८२ कोटी १५ कर्जाचे वाटप केले आहे. खरिपासाठी सप्टेंबरपर्यंत कर्जवाटपाची मुदत आहे. पीक कर्ज माफी सुरू असल्याने शिल्लक कालवधीत पीक कर्जाचे उद्दिष्ट गाठणार का नाही हे पाहावे लागणार आहे. 

राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांकडून अनास्था
जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांकडून संथ गतीने कर्जवाटप केले जात आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांना ६६४ कोटी २७ लाखांचे पीककर्जाचे उद्दिष्ट असून, या बॅंकांकडून केवळ २४२ कोटी ६२ लाख रुपयांचे, म्हणजेच उद्दिष्टाच्या ३७ टक्के वाटप करण्यात आले आहे, तर खासगी बॅंकांना १७३ कोटी ३० लाख रुपयांचे उद्दिष्ट असून, या बॅंकांकडून ४६ कोटी आठ लाख म्हणजेच उद्दिष्टाच्या २७ टक्के वाटप करण्यात आले आहे. पीक कर्ज वितरणाबाबत राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांकडून अनास्था दिसून येत आहे. वाटपाची दोन महिने मुदत शिल्लक असून, वाटपाची गती पाहता उद्दिष्टे गाठणे शक्‍य होणार नसल्याचे दिसून  येत आहे. 

Web Title: satara news farmer bank loan