नेत्यांच्या श्रेयवादात शेतकरी आंदोलन थंडावले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

सातारा - संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा संप आणि त्यातून झालेल्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व पक्ष सहभागी झाले; पण प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकरी संघटनांचे आंदोलन थोडे थंडावले आहे. संघटनांतील नेत्यांची नव्याने समिती स्थापन झाली असली, तरी त्यांच्यात श्रेयवाद उफाळला आहे. त्यामुळे आता केवळ पक्षीय पातळीवर आंदोलन सुरू असून, यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीवर आहे. 

सातारा - संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा संप आणि त्यातून झालेल्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व पक्ष सहभागी झाले; पण प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकरी संघटनांचे आंदोलन थोडे थंडावले आहे. संघटनांतील नेत्यांची नव्याने समिती स्थापन झाली असली, तरी त्यांच्यात श्रेयवाद उफाळला आहे. त्यामुळे आता केवळ पक्षीय पातळीवर आंदोलन सुरू असून, यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीवर आहे. 

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे आणि शेतीमालाला हमीभाव जाहीर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी एक जूनपासून संपाचे हत्यार उपसले. इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा संप केला. या संपात आघाडीवर राहिल्या त्या सर्व शेतकरी संघटना. त्यानंतर कोणा एकाला श्रेय जाऊ नये म्हणून विरोधी पक्षांसह सत्ताधारीही आपापली भूमिका शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न विविध माध्यमातून करू लागली आहेत. शेतकरी संघटनेतील काही नेत्यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे संप व आंदोलनात फूट पडली व तिसऱ्याच दिवशी आंदोलनाची तीव्रता कमी झाली; पण राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेही आपापल्या परीने संघर्ष सुरू ठेवला आहे. आता शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी एकत्र येऊन पुन्हा एक समिती स्थापन केली आहे. या नेत्यांत आंदोलनाचा श्रेयवाद उफाळला आहे. या नादात आंदोलनाकडे दुर्लक्ष होऊन शेतकऱ्यांचा संप व आंदोलन बाजूला पडले आहे. 

विरोधीसह सत्ताधारी पक्षांनी आपला शेतकऱ्यांसाठीचा अजेंडा सुरूच ठेवला आहे. कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्णय राष्ट्रवादी व शिवसेनेने घेतला आहे. सध्या जिल्ह्यात शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी जिल्हा संघटक प्रा. नितीन बानुगडे- पाटील, जिल्हाप्रमुख हर्षल कदम यांच्यासह पदाधिकारी कार्यरत झाले आहेत. 

दुसरीकडे विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीने नुकताच मूक मोर्चा काढून बळिराजांच्या मागणीची सनद मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी पाठविली आहे. उद्या (ता. 12) राष्ट्रवादी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. ज्यांनी शेतकऱ्यांसाठी संपाचे हत्यार उपसले त्या शेतकरी संघटनेतील नेत्यात श्रेयवाद सुरू झाल्याने आंदोलन बाजूला पडले आहे. प्रत्येक नेता दुसऱ्या नेत्याला आंदोलनातून बाजूला करण्याची रणनीती आखू लागला आहे. 

सध्या शेतकऱ्यांना मॉन्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. पाऊस सुरू झाल्यास शेतीच्या पेरणीपूर्व मशागतींच्या कामांना गती येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचेही या आंदोलनाकडे थोडे दुर्लक्ष झाले आहे, तर याचीच दुसरी बाजू म्हणजे एक जूनपासून सुरू झालेल्या आंदोलनात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्हे व त्यातून त्यांना झालेली अटकेमुळे नेत्यांना कार्यकर्त्यांचे जामीन करताना नाकीनऊ आले आहे. शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकरराव गोडसे यांनी या आंदोलनातील कार्यकर्त्यांना सोडविण्यावर भर दिला आहे; पण या सर्व परिस्थितीत शेतकरी संघटनांचे आंदोलन थंडावले असून, पक्षीय पातळीवर विविध माध्यमांतून संघर्ष सुरू आहे. 

कार्यकर्त्यांच्या जामिनासाठी नेत्यांची नाकीनऊ 
आंदोलनातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊन झालेल्या अटकेमुळे नेत्यांना कार्यकर्त्यांचे जामीन करताना नाकीनऊ येत आहे. त्यातच पोलिस व प्रशासनाकडून शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अडकवून ठेवण्यासाठी दरोड्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे अधिक तपासाच्या नावाखाली जामीन देऊ नये, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केल्याने कार्यकर्त्यांची सुटका होणे सोपे नाही.

Web Title: satara news farmer strike farmer