अखेर शेतकरी झाले लाभार्थी! 

विशाल पाटील
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

सातारा - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी देण्याबाबत दिवाळीपासून पिटलेला डंका अखेरीस आज साक्षात उतरला. जिल्ह्यातील 2,175 थकबाकीदारांच्या खात्यावर दहा कोटी 51 लाखांची रक्‍कम जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेकडून जमा करण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकरी तरी आता "होय, मी लाभार्थी,' असे म्हणू शकतील. 

दुष्काळी परिस्थितीसह विविध कारणांमुळे राज्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. 2014 ते 2016 या तीन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील तब्बल आठ हजार 651 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2017 मध्येही ते लोन, तसेच राहिल्याने विरोधी पक्षांनी गत अधिवेशात सरसकट कर्जमाफीसाठी गोंधळ घातला. त्यानंतर संघर्ष यात्राही काढली. या दरम्यान राज्यभर शेतकरी आंदोलन उभे राहून शेतकऱ्यांनी आक्रमकपणे उभा महाराष्ट्र बंद केला. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत, तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 15 ते 25 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला. तसा अध्यादेश सहकार विभागाने 28 जूनला काढला. 

कर्जमाफीच्या अध्यादेशातील निकषानुसार, 1 एप्रिल 2012 नंतर ज्यांनी कर्ज घेतलेले आहे आणि 30 जून 2016 रोजी जे थकबाकीदार आहेत, अशा शेतकऱ्यांची यादी तयार केली. त्यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार 203 शेतकऱ्यांचा समावेश झाला. मात्र, त्यातील 28 अर्जदार शेतकरी अपात्र ठरले. त्यातील पात्र 2175 थकबाकीदार शेतकऱ्यांना दहा कोटी 51 लाखांची रक्‍कम संबंधितांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक महेश कदम, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली. 

एकूण अर्जदार शेतकरी : 40,747 
पहिली हिरवी यादी : 19,056 
थकबाकीदार शेतकरी : 2,203 
अपात्र थकबाकीदार : 28 
लाभार्थी थकबाकीदार : 2175 
(माहिती स्तोत्र : जिल्हा उपनिबंधक कार्यालय) 

Web Title: satara news farmers became beneficiaries