‘फिश मार्केट’चा निधी परत जाण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

सातारा - शीतगृहासह अत्याधुनिक सुविधा असणारे ‘हायजेनिक फिश मार्केट’ शाहूपुरीजवळील मतकर कॉलनीत उभारण्याचे पालिकेचे नियोजन आहे. सुमारे पावणेतीन कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी पालिकेला २० लाख रुपयांचा निधीही मिळाला आहे. मात्र, नियोजित प्रकल्पाच्या नकाशाला जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदिल अद्याप न मिळाल्याने हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच रखडला आहे. वेळेत प्रकल्प सुरू न झाल्यास त्याकरिता आलेला निधी परत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. 

पालिकेचे फिश मार्केट सध्या सदाशिव पेठेत आहे. याठिकाणी सुमारे ३५ व्यावसायिक बसतात. ही जागा अत्यंत अपुरी, गैरसोईची व शहराच्या मध्यवस्तीत आहे. या ठिकाणी विस्तारीकरणासाठी आवश्‍यक जागा उपलब्ध नसल्याने सातारा पालिकेने बुधवार नाका ते मोळाचा ओढा रस्त्यावर, मतकर कॉलनीतील स्वत:च्या जागेत अत्याधुनिक फिश मार्केट उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याला राष्ट्रीय मत्स्योद्योग विकास महामंडळाची मंजुरी आहे. मनोमिलन पर्वात, सप्टेंबर २०१४ मध्ये प्रस्तावित मार्केटचे भूमिपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले होते. सध्या ही जागा पालिका हद्दीबाहेर असली तरी हद्दवाढीनंतर ती शहराचा भाग असणार आहे. या मार्केटसाठी सुमारे पावणेतीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय मत्स्योद्योग विकास महामंडळ या मार्केटच्या उभारणीसाठी सव्वादोन कोटी रुपये अनुदान स्वरूपात देणार आहे. 

नियोजित मार्केटमध्ये तळमजल्यावर ४१, तर पहिल्या मजल्यावर २४ असे ६५ दुकान गाळे असतील. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सव्वातीन हजार चौरस फुटांचा भव्य हॉल, शिवाय शीतगृह, बर्फाचे तुकडे करण्याचे मशिन, स्वच्छतागृह व पाण्याची सोय, माल लोड-अनलोड करण्यासाठी प्लॅटफॉर्म आदी सुविधा असतील. याशिवाय पार्किंग, अंतर्गत रस्ते, मोटाररूम, सेप्टिक टॅंक आदी सुविधा देण्याचे नियोजन आहे. 

२० लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत
या मार्केटच्या कामाकरिता शासनाचे सुमारे २० लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत येऊन पडले आहेत. गेल्या तीन वर्षांत नियोजित मार्केटचा दगडीही हाललेला नाही. इमारतीचा नकाशा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. शासनाने यापूर्वी अनेकदा पालिकेस काम  सुरू करा, अन्यथा निधी परत जाईल, अशी तंबी दिली आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर काहीच कार्यवाही होत नसल्याने निधी परत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. 

Web Title: satara news fish market