गणेशमूर्तीची उंची अन्‌ आकर्षकतेवर किंमत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

सातारा - घरातील सुंदर मखरात गणेशाची तेवढीच सुंदर आणि प्रसन्न मूर्ती असावी, यासाठी नागरिक मूर्ती चोखंदळपणे निवडू लागले असून, मोती चौकापासून सातारा-कोरेगाव रस्त्यावरील स्टॉलवर नागरिकांची सहकुटुंब गर्दी वाढू लागली आहे. अमेरिकन डायमंडने मढविलेल्या, वेल्वेटसदृश रंगकाम केलेल्या मूर्तींना नागरिकांची पसंती वाढत आहे.

सातारा - घरातील सुंदर मखरात गणेशाची तेवढीच सुंदर आणि प्रसन्न मूर्ती असावी, यासाठी नागरिक मूर्ती चोखंदळपणे निवडू लागले असून, मोती चौकापासून सातारा-कोरेगाव रस्त्यावरील स्टॉलवर नागरिकांची सहकुटुंब गर्दी वाढू लागली आहे. अमेरिकन डायमंडने मढविलेल्या, वेल्वेटसदृश रंगकाम केलेल्या मूर्तींना नागरिकांची पसंती वाढत आहे.

आठ दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाचे वेध नागरिकांना केव्हाच लागले आहेत. उत्सवातील मूर्तीही सुंदर आणि पाहताच मनाला प्रसन्नता देणारी असावी अशीच सर्वांची धारणा असते. त्यामुळे नागरिक विविध स्टॉलना भेटी देऊनच मूर्ती पसंत करत आहेत. सध्या मोती चौकापासून सर्वत्र गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल लागले आहेत. बहुतेक स्टॉलवर स्थानिक व जिल्ह्यातील कारागिरांनी तयार केलेल्या मूर्ती आहेत. फारच थोड्या विक्रेत्यांनी पेण, पनवेलवरून मूर्ती आणल्या आहेत. स्थानिक कलाकारांच्या मूर्तींही यावर्षी अत्यंत आकर्षक आहेत. कलाकारांनी रंगात, मूर्ती रेखाटण्यात विविधता आणली आहे. रंगकामात मूर्तीची वस्त्रे वेल्वेटसदृश रंगात रंगविल्याने मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत. मूर्तींना खरोखरची कापडी वस्त्रे परिधान केलेल्या मूर्तीही तुरळक उपलब्ध आहेत.

गेल्या काही वर्षांत कलाकार मूर्तीला आकर्षक करण्यासाठी अमेरिकन डायमंडचा वापर करू लागले आहेत. मूर्तींच्या हातातील अंगठीपासून शिरपेचापर्यंत चमकणाऱ्या रंगीबेरंगी या खड्यांमुळे मूर्ती फारच मनमोहक वाटतात. अर्थातच त्यांच्या किमतीही जास्त आहेत. मात्र, अनेक नागरिक हौसेला मोल नाही... ही म्हण प्रत्यक्षात आणून अशा मूर्तींनाच पसंती देत आहेत. साध्या एक फुटापर्यंतची मूर्ती ३०० रुपयांपर्यंत आहे. तर तीच अमेरिकन डायमंडची मूर्ती दोन-अडीच हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे. गणेशमूर्तीची उंची, आकर्षकतेवर किमती आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत साधारण दहा टक्के किमती वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. शहरात शाहू चौकासह काही स्टॉलवर शाडूच्या मूर्तीही विक्रेत्यांनी उपलब्ध केल्या आहेत. 

दरम्यान, सातारा-कोरेगाव रस्त्यानजीक राजस्थानी, गुजराती कलाकारांनीही मूर्ती मोठ्या प्रमाणावर केल्या आहेत. या मूर्ती काहीशा स्वस्त मिळतात. त्यामुळे या ठिकाणीही मूर्ती पाहण्यासाठी व ठरविण्यासाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. विविध मंडळांचे कार्यकर्तेही मूर्ती ‘बुक’ करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.

Web Title: satara news ganeshotsav

टॅग्स