सामूहिक बलात्कारामुळे  माण तालुक्‍यात खळबळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

मलवडी - माण तालुक्‍यातील एका गावात विवाहितेवर तिच्या नातेवाईकासह तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिचा चुलत मावसभाऊ आणि त्याचे साथीदार काशा व मंग्या (पूर्ण नावे समजली नाहीत) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तिघेही संशयित घटनेनंतर फरार झाले आहेत. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की ही महिला आपल्या कुटुंबीयांसह राहते. मंगळवारी (ता. 20) रात्री साडेअकराच्या सुमारास कोणीतरी घराचा दरवाजा वाजवल्यामुळे दरवाजा उघडून ही महिला बाहेर आली. त्यावेळी बाहेर तिचा चुलत मावसभाऊ आणि काशा व मंग्या हे त्याचे साथीदार दारात उभे होते. "तुझा नवरा आज घरी येणार नाही,' असे सांगत तिघांनी तिचे तोंड दाबले व उचलून घेऊन जवळच असलेल्या शेतात नेले. त्यानंतर तिच्या चुलत मावसभावाने आणि नंतर काशा व मंग्या यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला काही सांगितले तर मारून टाकीन, अशी धमकी दिली. 

चुलत मावसभावानेच आपल्या साथीदारांसह केलेल्या या कृत्यामुळे या गावाचा परिसर हादरला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासाला गती दिली आहे. 

या घटनेची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, संशयितांवर बलात्कारासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही संशयित फरार आहेत. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: satara news gang rape case