दिवाळसणामुळे कचऱ्यात वाढ

दिवाळसणामुळे कचऱ्यात वाढ

सातारा - दिवाळसणामुळे सातारकरांच्या कचऱ्यात प्लॅस्टिक कचऱ्याची मोठी वाढ झाली आहे. रोज गोळा होणाऱ्या कचऱ्यापैकी ६० टक्के कचरा हा प्लॅस्टिकचा असल्याचे आढळून आले आहे. प्लॅस्टिक वापराच्या दुष्परिणामांबाबत व्यापक प्रबोधन होऊनही सातारकरांच्या सवयींमध्ये फारसा फरक पडला नाही, हेच प्लॅस्टिक कचऱ्याच्या ढिगांवरून स्पष्ट झाले आहे. 
सातारा शहरातून रोज ५५ ते ६० टन कचरा गोळा होतो. दिवाळसणामुळे या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, झालेली ही वाढ प्लॅस्टिक कचऱ्याची आहे. कापड दुकाने, मेवा-मिठाई, खाद्यपदार्थांची दुकाने, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, ऑनलाइन शॉपिंग यांतून खरेदी केल्यानंतर मिळणाऱ्या वस्तू प्लॅस्टिकच्या आवरणातून मिळतात. हे प्लॅस्टिक घरोघरच्या कचऱ्यातून बाहेर फेकले जाते. साताऱ्यात गेल्या काही दिवसांत जागोजागी दिसणाऱ्या कचऱ्यांच्या ढिगांमध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.

पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोतदेखील गोळा होणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण ६० टक्‍क्‍यांपर्यंत आढळून येत असल्याचे निरीक्षण पालिका सूत्रांनी नोंदवले. प्लॅस्टिकचा वापर टाळण्याबाबत वेळोवेळी प्रबोधन सुरू असूनही नागरिकांच्या सवयींमध्ये फारसा फरक पडत नसल्याचे यामुळे स्पष्ट झाले. 

प्लॅस्टिक हे पर्यावरणास व त्याहीपेक्षा जास्त ते आपल्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. त्याचा वापर कमीत कमी केला पाहिजे.

याबाबत शहरात अनेक व्यक्ती आणि संस्था प्रबोधन करत असतात. मात्र, नागरिकांच्या वागण्यात फारसा फरक नाही. कायदा असूनही व्यापारी-विक्रेतेही त्याबाबत काळजी घेत नाहीत, हे अधिक चिंताजनक आहे. 

कारवाईनेही फरक नाही
५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांची विक्री करण्यास कायद्याने बंदी आहे. अशा पिशव्यांची विक्री कोणी करत असेल तर पालिका त्यांच्यावर कारवाई करते. साताऱ्यात अधिकारी वारंवार छापे टाकून कारवाई करत असतात, तरीही विक्रेते-दुकानदार अशा पिशव्यांचा सर्रास वापर करतात. 

प्लॅस्टिकचे दुष्परिणाम
नागरिकांच्या दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे. वापरानंतर हे प्लॅस्टिक कोठेही टाकले जाते. नाले प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या, वेष्टणे याने भरून जातात. पर्यायाने गटारे तुंबतात. डासांची उत्पत्ती वाढते. गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहते. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर निश्‍चितच परिणाम होतो. जंगलात प्लॅस्टिक पडल्यास तेथे गवतही व्यवस्थित उगवत नाही.

इथेही असतो कचराच  
गोडोली तळे, करंजे नाका, खेड नाका, कल्याणी बरॅक परिसर
मरिआई कॉम्प्लेक्‍स, टिळक चर्च, भवानी पेठ मंडई 
कापड दुकानांबाहेर, दवाखाने आणि रुग्णालयांचा परिसर 
सणासुदीच्या काळात घरातील कचऱ्यात ५० टक्के प्लॅस्टिकच

याला प्लॅस्टिक ऐसे नाव..!
प्लॅस्टिकचे विघटन होत नाही; ते वर्षानुवर्षे कुजत नाही 
प्लॅस्टिकमधून धोकादायक कार्बन मोनॉक्‍साईडसारखा वायू बाहेर पडतो
जमिनीवरच्या उत्पादक थरात प्लॅस्टिकचे प्रमाण वाढल्याने शेतजमिनीची उत्पादकता घटते
प्लॅस्टिक जाळल्याने निघणाऱ्या रासायनिक धुरातून पर्यावरणाला धोका निर्माण होतो
नाल्यातील पाण्याचा निचरा प्लॅस्टिकमुळे होत नाही 
जिल्ह्यात जनावरांचा प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत 

काय करता येईल...!
कापडी पिशव्या-स्टिलच्या डब्यांचा वापर
प्लॅस्टिक पिशवी मागू नका, देऊही नका 
प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांचे फलक लावावेत
चहापान, सरबतासाठी धातू-काचेचे पेले वापरावेत
प्लॅस्टिक बाटल्यांऐवजी धातू-काचेच्या बाटल्या वापरा

प्लॅस्टिक जाळल्यानंतर होणारे आजार 
श्‍वसनविकाराचे आजार (उदा. दमा)
श्‍वसनक्षमता कमी होते
कर्करोग 

काय सांगतो कायदा..?
महाराष्ट्र नॉन बायोडिग्रेबल गार्बेज ऑर्डिनन्स २००६च्या कायद्यानुसार अजैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. नदी, नाले, तलाव, गटारे, मोकळ्या खाणींमध्ये प्लॅस्टिक कचरा टाकण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. कायद्यातील तरतुदींचा भंग केल्यास पहिल्या गुन्ह्याकरिता पाच हजार व दुसऱ्यांदा पुन्हा भंग झाल्यास १० हजार रुपये दंड आहे. तिसऱ्यावेळी २५ हजार रुपये दंडाची व तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com