उष्णतावाढीमुळे आले लागवड रखडणार

विकास जाधव
गुरुवार, 5 एप्रिल 2018

काशीळ - अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर होणारी आले लागवड उष्णतेत होत असलेल्या वाढीमुळे रखडणार आहे. बियाणे खरेदी व मशागतीची कामे संथ गतीने सुरू आहेत. मागील तीन ते चार वर्षांपासून दरातील अस्थिरतेमुळे आले पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे. 

काशीळ - अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर होणारी आले लागवड उष्णतेत होत असलेल्या वाढीमुळे रखडणार आहे. बियाणे खरेदी व मशागतीची कामे संथ गतीने सुरू आहेत. मागील तीन ते चार वर्षांपासून दरातील अस्थिरतेमुळे आले पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे. 

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह दुष्काळी तालुक्‍यामधील शेतकरी आले पीक घेतात. आले पिकाच्या दरात मोठ्या प्रमाणात अस्थिरता असतानाही जिल्ह्यात आल्याची लागवड सातत्याने होते. या वेळी मात्र दराच्या अस्थिरतेबरोबरच वाढलेल्या उष्णतेमुळे अगदीच संथगतीने आल्याची लागवड सुरू आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर शेतकरी आले लागवड करतात. विशेष करून नदीकाठी व कालव्याचे पाणी उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी आले लागवडीसाठी पूर्व मशागत सुरू झालेली आहे. जिल्ह्यात साधारणपणे अडीच हजार हेक्‍टरवर आल्याची लागवड होते. मुहूर्तावर यातील सुमारे १५ ते २० टक्के आल्याची लागवड होण्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. आले लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेताची मशागतीच्या कामांना प्रारंभ झाला आहे, तसेच लागवडीसाठी लागणाऱ्या बियाण्याची खरेदी सुरू करण्यात आली आहे. सध्या तापमान वाढले असून, त्याचा लागवडीवर परिणाम होणार आहे. वाढलेल्या तापमानात लागवड केलेल्या आल्याची उगवण उशिरा होते, तसेच आलेला कोंब विकृत पद्धतीने वाढून उत्पादनावर परिणाम होत असतो. उन्हाळी पावसाने वेळेत हजेरी लावल्यास आले लागवड करण्यास गती येईल. मात्र, पावसाचे आगमन उशिरा झाल्यास आले लागवड पुढे जाणार आहे. उशिरा आले लागवड झाल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता असल्यामुळे उशिरा आले करण्याचे शेतकऱ्यांकडून टाळले जाते. उष्णता वाढ आणि दरातील होत असलेल्या घसरणीमुळे गेल्या वर्षीप्रमाणे या हंगामात आले पिकांच्या क्षेत्रात ४०० ते ५०० हेक्‍टरने घट होण्याचा अंदाज आहे. 

चीनमध्ये उत्पादनात वाढ
मागील चार ते पाच वर्षांपासून चीनमध्ये आल्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. या आल्याचे दर कमी असल्यामुळे आले पिकांच्या दरातील घसरण होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. त्याचबरोबर कर्नाटक राज्यातील बेळगाव व बंगळूर या परिसरात आल्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या परिसरातील आले राज्यातील आल्याच्या तुलनेत बाजारात विक्रीसाठी लवकर येते. यामुळे राज्यातील आल्यास दर कमी मिळतो, तसेच साताऱ्यासह मराठवाड्यामधील आल्याचे क्षेत्र मोठे आहे. मात्र, आल्याचा खोडवा घेण्याचा कल जास्त असल्याने  प्रक्रियायुक्त पदार्थांना तयार करण्यासाठी हे आले उपयोगी येत नसल्यानेही दर कमी मिळतो. 

आले लागवडीसाठी बियाण्याची खरेदी झाली असून, लागवडीचे क्षेत्र तयार करून ठेवलेले आहे. सध्या उष्णता वाढली असल्यामुळे लागवड करता येणे शक्‍य होणार आहे. उष्णता कमी झाल्यावर लागवड करणार आहे. 
- जयवंत पाटील, प्रगतशील शेतकरी, पाल, जि. सातारा

Web Title: satara news ginger cultivation summer