मुलींच्या जन्माचे होतेय स्वागत!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

सातारा - वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा, या मानसिकतेतून सातारा जिल्ह्यातील समाज आता बाहेर पडू लागला आहे. घरोघरी आता मुलींचे स्वागत होत असून, एक, दोन मुलींवरही कुटुंब नियोजन करणाऱ्या दांपत्यांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, जिल्ह्याचा स्त्री- पुरुष जन्मदर वाढत असून, चालू वर्षात तो ९२२ वर पोचला आहे. 

सातारा - वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा, या मानसिकतेतून सातारा जिल्ह्यातील समाज आता बाहेर पडू लागला आहे. घरोघरी आता मुलींचे स्वागत होत असून, एक, दोन मुलींवरही कुटुंब नियोजन करणाऱ्या दांपत्यांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, जिल्ह्याचा स्त्री- पुरुष जन्मदर वाढत असून, चालू वर्षात तो ९२२ वर पोचला आहे. 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा वारसा असलेल्या सातारा जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे स्वागत होऊ लागले आहे. मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडली गेली असून, अनेक महिला विविध पातळ्यांवर यश मिळवत आहेत. वंश परंपरा चालविण्यासाठी मुलगा हवाच, ही मानसिकता आता बदलू पाहात आहे. अनेक उच्च शिक्षित, मध्यमवर्गीय, अल्प उत्पन्न गटातील दांपत्येही आता मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करत आहेत, तरीही काही पातळीवर ही मानसिकता वाढविण्याची गरज आहे. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत एप्रिल ते मार्चअखेरपर्यंत मुलामुलींच्या जन्मानुसार स्त्री-पुरुष जन्मदर काढला जातो. एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत जिल्ह्याचा जन्मदर ९२२ वर पोचला आहे.

तालुकानिहाय स्त्री-पुरुष जन्मदर असा : जावळी ८९९, कऱ्हाड ९५६, खंडाळा ८४०, खटाव ९१०, कोरेगाव ८७३, महाबळेश्‍वर ९०५, माण १०२२, पाटण ९७८, फलटण ९५७, सातारा ९१३, वाई ८९०. मार्चनंतर हा जन्मदर अंतिम केला जाणार असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले. 

२००४-०५ ते २०१६-१७ या वर्षातील पुरुष- स्त्री जन्मदर जाहीर झाला असून, त्यात २०११ मध्ये देशात ९४३, महाराष्ट्रात ९२९, तर सातारा जिल्ह्याचे प्रमाण ८८० इतके आहे. दरम्यान, जिल्ह्याचा दर वर्षी जन्मदर वाढू लागला 
आहे, हे आरोग्य विभागाच्या माहितीनुसार स्पष्ट होत आहे. 

वर्षनिहाय जिल्ह्याचा स्त्री-पुरुष जन्मदर 
२००४-०५ : ८८४, २००५-०६ : ८६८, २००६-०७ : ८५४, २००७-०८ : ८८७, २००८-०९ : ८६७, २००९-१० : ८७२, २०१०-११ : ८६१, २०११-१२ : ८८०, २०१२-१३ : ९१५, २०१३-१४ : ९१६, २०१४-१५ : ९२३, २०१५-१६ : ९२७, २०१६-१७ : ९२०, २०१७ ते जानेवारीअखेर : ९२२.

Web Title: satara news girl born welcome