ग्रेस गुण मिळण्यात खेळाडूंना अडचण

Online Form
Online Form

सातारा - बहुतांश एकविध खेळाच्या संघटनांनी आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने यंदाही एकविध खेळ संघटनांद्वारे आयोजिलेल्या स्पर्धांत प्रावीण्य मिळविलेल्या, सहभागी झालेल्या खेळाडूंना सवलतीचे (ग्रेस) मिळण्याच्या आशा दुरापास्त असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, यंदापासून (२०१७- १८) शैक्षणिक संस्थांनी ग्रेस गुणांसाठीचे प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने भरणे शासनाने अनिवार्य केले आहे. 

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून ग्रेस गुण दिले जातात. त्यामध्ये क्रीडा विभाग व एकविध खेळ संघटनांद्वारे आयोजिलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी झालेल्या व आंतरराष्ट्रीय, 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य (प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक) मिळविलेल्या खेळाडूंना २५ गुण, क्रीडा विभाग व एकविध खेळ संघटनांद्वारे आयोजिलेल्या राष्ट्रीय स्पर्धांत सहभागी झालेल्या व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूंना २० गुण, तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना १५ गुण देण्यात येतात. या योजनेचा लाभ खेळाडूंना व्हावा, यासाठी शासनाने यंदा शाळा, महाविद्यालयाकडून ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव मागविले आहेत. एक जून २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत झालेल्या क्रीडा स्पर्धांतील खेळाडूंचे प्रस्ताव www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ‘आपले सरकार’ या पोर्टलवर, लॉग-इन आय डी तयार करून भरावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापूर विहीत नमुन्यातील अर्ज, खेळाडूचे प्रमाणपत्र व हॉल तिकिटाची सत्य प्रत मुख्याध्यापकांच्या सही व शिक्‍क्‍यासह संबंधित शाळेने २८ फेब्रुवारीपूर्वी पोर्टलवर अपलोड करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे. ग्रेस गुणांचा अर्ज भरताना ब्राऊजरद्वारा प्रिव्हेंशन आल्यास त्यासाठी allow pop-ups from aaple sarkar हा ऑप्शन निवडवा. त्यानंतर पुन्हा वरीलप्रमाणे कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.  

एकविध खेळाच्या संघटनांकडून दुर्लक्ष
यंदाही बहुतांश एकविध खेळ संघटनांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अद्याप अंमलबजावणी न केल्याने अनेक खेळाडूंना ग्रेस गुण मिळणार नाहीत. ज्या खेळाडूंनी शालेय स्तरावरील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांत प्रतिनिधित्व केले आहे, अशा खेळाडूंना गुण मिळण्यासाठी अडचण भासणार नाही, असे मत क्रीडा क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com