निवडणूक गावात अन्‌ खलबते मुंबईत

राजेश पाटील
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

ढेबेवाडी - शिवारांसह चौकाचौकांत आणि पारांवर रंगणाऱ्या गप्पा, अंतर्गत बैठका, गुप्त गाठीभेटी आणि डाव-प्रतिडावांची आखणी अशा वातावरणात गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकांच्या राजकारणाने चांगलीच उसळी घेतली आहे. गावपुढारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची सुरू असलेली धावपळ पाहून निवडणूक ग्रामपंचायतीची की विधानसभेची...? असा प्रश्‍न पडताना दिसतो. गावाकडील निवडणूक असली तरी रणनीतीची खलबते मात्र मुंबईत सुरू असल्याचेही चित्र दृष्टीला पडत आहे.

ढेबेवाडी - शिवारांसह चौकाचौकांत आणि पारांवर रंगणाऱ्या गप्पा, अंतर्गत बैठका, गुप्त गाठीभेटी आणि डाव-प्रतिडावांची आखणी अशा वातावरणात गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकांच्या राजकारणाने चांगलीच उसळी घेतली आहे. गावपुढारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची सुरू असलेली धावपळ पाहून निवडणूक ग्रामपंचायतीची की विधानसभेची...? असा प्रश्‍न पडताना दिसतो. गावाकडील निवडणूक असली तरी रणनीतीची खलबते मात्र मुंबईत सुरू असल्याचेही चित्र दृष्टीला पडत आहे.

विभागात १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. ढेबेवाडीसह ताईगडेवाडी (तळमावले), सणबूर, बनपुरी, मालदन या मोठ्या आणि राजकीय प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायतींसह महिंद, अंबवडे, कारळे, पाणेरी, भोसगाव, मराठवाडी, घोटील, मत्रेवाडी, साईकडे, गलमेवाडी, शेंडेवाडी, चौगुलेवाडी, चाळकेवाडी या ग्रामपंचायतींचा त्यामध्ये समावेश आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच काही महिने अगोदर या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या अनुषंगाने राजकीय मोर्चेबांधणी सुरू होती. आता या हालचालींनी वेग घेतला आहे. खरिपातील पीक काढणीचा हंगाम हातघाईवर आहे. दिवसभर गजबजलेली शिवारे आणि ओस पडलेली गावे असेच चित्र सर्वत्र दिसत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या मोर्चेबांधणीच्या बैठका रात्रीच होत आहेत. 

आमदार शंभूराज देसाई, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, आमदार नरेंद्र पाटील, काँग्रेसचे नेते हिंदूराव पाटील, भाजपचे भरत पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, आशिष आचरे, संजय देसाई, राहुल चव्हाण आदी राजकारणातील प्रमुख ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही ठिकाणी पडद्याआडून, तर काही ठिकाणी खुलेपणाने आपली ताकद लावणार असल्याने अनेक ठिकाणी मोठी चुरस बघायला मिळेल. त्यातील ढेबेवाडी, ताईगडेवाडी (तळमावले), सणबूर, बनपुरी, मालदन या महत्त्वाच्या ग्रामपंचायती कुणाकडे जाणार, याबद्दलही जनतेत कमालीचे औत्सुक्‍य आहे. 

सरपंचपद खुले असलेल्या ठिकाणी ‘कांटे की टक्कर’ होण्याची चिन्हे आहेत. विभागातील बहुसंख्य लोक नोकरी व व्यवसायानिमित्ताने मुंबईत आहेत. गावाकडील निवडणुकांसह महत्त्वाच्या प्रसंगात मुंबईकरांचा निर्णय महत्त्वाचा ठरतो. 

या निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत खलबते सुरू असून तेथील बैठकांतील निर्णय गावाकडे कळविण्यात येत आहेत. अनेकांची राजकीय ताकद दाखवून देणारी ही निवडणूक असल्याने गावागावांवर कब्जा करण्यासाठी नेते मंडळी सोयीनुसार वेगवेगळी समीकरणे जुळवत आहेत.

ढेबेवाडीकरांच्या मनात चाललंय काय...?
ग्रामपंचायतीवर आमदार देसाई गटाची सत्ता आहे. गड अबाधित राखण्यासाठी देसाई गटाने, तर सत्ता खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसनेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. बेरजेच्या राजकारणासाठी येथे कोण कुणाच्या पोटात शिरलंय..? हे लवकरच समोर येणार आहे. विशेषतः आमदार नरेंद्र पाटील यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील आणि काँग्रेस नेते हिंदूराव पाटील यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची ठरणार आहे. ढेबेवाडीतील मतदारांच्या मनात काय शिजतंय...? याचा अंदाज निकाल लागेपर्यंत कुणीच बांधू शकणार नाही.

Web Title: satara news grampanchayat election