पावसाच्या व्यत्ययाने उमेदवारांची कसरत! 

पावसाच्या व्यत्ययाने उमेदवारांची कसरत! 

पाटण - पाटण तालुक्‍यातील 86 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीस सुरवात झाली आहे. 70 ग्रामपंचायतींत स्थानिक कार्यकर्ते प्रचारात मग्न असून, देसाई- पाटणकर अशा पारंपरिक लढतींबरोबर वर्चस्ववादातून गटांतर्गत लढती आणि एकाच पक्षातील दोन पॅनेलमधील लढतीत एका पॅनेलला विरोधकांचे खतपाणी, असा सामना रंगणार आहे. खरिपाची काढणी व पावसाच्या व्यत्ययामुळे उमेदवारांची प्रचारात तारेवरील कसरत पाहावयास मिळत आहे. 

सुरू झालेल्या निवडणुकीतील 16 सरपंच, 16 ग्रामपंचायती, 214 सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. 70 ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. रासाटी ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या पाटील बंधूंविरुद्ध शिवसेनेचे गणपत कदम, मनसेचे दया नलवडे व अर्जुन कदम आणि राष्ट्रवादीचा गट अशी अटीतटीची लढत होणार असून, पाटील बंधूंना प्रथमच आव्हान उभे राहिले आहे. मणेरीत सरपंचपदासाठी "राष्ट्रवादी'चे दोन उमेदवार व शिवसेनेचा उमेदवार अशी तिरंगी लढत होत आहे. म्हावशी हे पाटणकरांचे गाव. या ठिकाणी गटांतर्गत लढत प्रतिष्ठेची झालेली पाहावयास मिळते. बनपेठ व येराडला देसाई-पाटणकर असा पारंपरिक सामना पाहावयास मिळणार आहे. 

अडुळपेठमध्ये देसाई गटांतर्गत सामना असून, उपसरपंच प्रकाश पवार पॅनेलच्या विरोधात देसाई गटांतर्गत दुसरा गट कामाला लागला आहे. माजी सरपंच व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजाराम शिर्के यांच्या राष्ट्रवादीने या गटाबरोबर युती केली आहे. नाडेत पारंपरिक लढतच सुरू आहे. ढोरोशी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या महेंद्र मगर व संजय घाडगे यांची दोन व शिवसेनेचे पॅनेल अशी तिरंगी लढत तारळे भागाचे लक्ष वेधून घेत आहे. मारुल-हवेली ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील व कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील असा जंगी मुकाबला चर्चेचा विषय आहे. 

नाटोशी ग्रामपंचायतीत घणघोर रणसंग्राम शिगेला पोचलेला आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य रंगराव जाधव व देसाई गटाच्या युती बरोबर विद्यमान सरपंच निवास पाटील यांच्या पॅनेलमध्ये दुरंगी लढती मोरणा विभागात लक्षवेधी ठरणार आहे. ढेबेवाडीत माजी सभापती वनिता कारंडे यांचे पती नारायण कारंडे विरुद्ध राष्ट्रवादी समोरासमोर भिडले आहेत. सणबूर ग्रामपंचायत ही सभापती उज्ज्वला जाधव यांच्या गावची. या ठिकाणीही अटीतटीचा सामना प्रतिष्ठेचा झाला आहे. 

माजगाव सरपंचपदाच्या लढतीकडे लक्ष  
चाफळ विभागातील माजगावमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहनराव पाटील यांचे चिरंजीव रवी पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या विजया पाटील यांचे चिरंजीव प्रमोद पाटील आणि साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम पाटील हे सरपंचपदाच्या शर्यतीत उतरल्याने ही तिरंगी लढत तालुक्‍यात चर्चेचा विषय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com