शिरवळ, असवलीत "हायटेक' प्रचार 

शिरवळ, असवलीत "हायटेक' प्रचार 

खंडाळा  - तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या शिरवळ व असवली या दोन्ही ग्रामपंचायतींचा निवडणूक प्रचाराचा ज्वर वाढला आहे. उमेदवारांकडून "हायटेक' प्रचार यंत्रणा राबवली जात आहे. प्रचाराचे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला आहे. दोन्ही ग्रामपंचायतींत सरपंचपद महिला सर्वसाधारण आरक्षण असून, तीन उमेदवार रिंगणात उतरले असल्यामुळे येथे महिलाराज येणार आहे. 

शिरवळ येथे शिरवळ शहर विकास आघाडी, शिरवळ परिवर्तन विकास महाआघाडी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होत आहे. शहर विकास आघाडीतून अस्मिता भापकर, परिवर्तन विकास महाआघाडीतून लक्ष्मी पानसरे तर अपक्ष जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वाती बरदाडे या सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शेवटच्या टप्प्यात प्रचार शिगेला पोचला असून, जिल्ह्यातील व स्थानिक आमदारांपासून ते अगदी मंत्र्यांच्या प्रचारसभांची तयारी असल्याचे बोलले जात आहे. तशा मोर्चेबांधणीला वेग आला असून, प्रत्येक आघाडी प्रचारात व्यस्त आहे. 

शिरवळमध्ये सहा वॉर्डातील 17 सदस्यपदांच्या जागांसाठी 52 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेवटचे दोन दिवस प्रचाराचे उरल्याने मतदारराजाला भुलविण्यासाठी विविध "फंडे' वापरले जात आहेत. शिरवळ येथून जिल्हा  व तालुक्‍यातील विविध पदांवर नेतृत्व केले असल्याने येथील निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. 17 ऑक्‍टोबरला सर्व चित्र स्पष्ट होणार असल्याने कोणाची दिवाळी गोड ? हे कळणार आहे. 

असवलीतही चुरस  
असवलीत खंडाळा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक दत्तानाना ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली श्री जन्नीदेवी विकास पॅनेल, तर जिल्हा राष्ट्रवादी औद्योगिक सेलचे अध्यक्ष बंडू ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली (कै.) सोनबा (बापू) विकास आघाडी ही दोन्ही पॅनेल एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. सत्ताधारी दत्तानाना ढमाळ पुरस्कृत गट विकासकामांच्या जोरावर मतदारांपुढे जात असून, विरोधी बंडू ढमाळ हे विकासात्मक दृष्टिकोन व समस्या पुढे करून लढत देत आहेत. मात्र, मतदार कोणाच्या पारड्यात आपली मते टाकणार ? हे महत्त्वाचे आहे. येथेही प्रचाराला वेग आला असून, घरभेटी, परगावच्या मतदारांची जुळवाजुळव, भावकी, वाड्याला अधिक जोर दिला जात आहे. सरपंचपदासाठी जन्नीदेवी विकास पॅनेल पुरस्कृत मनीषा सचिन ढमाळ, तर (कै.) सोनबा (बापू) विकास आघाडी पुरस्कृत मनीषा दीपक ढमाळ आणि अपक्ष वैशाली विनय ढमाळ या एकमेकांसमोर उभे ठाकल्या आहेत. तीन प्रभागांतून नऊ सदस्यांच्या जागांसाठी 19 जण रिंगणात उतरले आहेत. सत्ताधारी गटाला पुन्हा सत्ता मिळणार की, परिवर्तन होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com