सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांत चढाओढ

विलास साळुंखे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

भुईंज - वाई तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भुईंज, किकली या ग्रामपंचायतींचे निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. तालुक्‍यातील इतर गावांबरोबर भुईंजमधील राजकीय वातावरण तापले आहे. गावोगावी सत्ता आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांत चढाओढ सुरू आहे. आखाड्यातील उमेदवारांसाठी राजकीय कार्यकर्त्यांच्या हालचाली गतिमान झाल्या असून ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी मातब्बर नेत्यांचा कस लागणार आहे.

भुईंज - वाई तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भुईंज, किकली या ग्रामपंचायतींचे निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. तालुक्‍यातील इतर गावांबरोबर भुईंजमधील राजकीय वातावरण तापले आहे. गावोगावी सत्ता आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांत चढाओढ सुरू आहे. आखाड्यातील उमेदवारांसाठी राजकीय कार्यकर्त्यांच्या हालचाली गतिमान झाल्या असून ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी मातब्बर नेत्यांचा कस लागणार आहे.

वाई तालुक्‍यातील निवडणूक होत असलेल्या बहुतांश ग्रामपंचायतींवर आमदार मकरंद पाटील, तर काही ग्रामपंचायतींवर किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या गटाची सत्ता आहे. ग्रामीण भागातील सत्तास्थानावरच आमदारकीच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असल्यामुळे ग्रामपंचायतीवर सत्ता अबाधित राखण्यासाठी आमदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांची, तर सत्ता प्रस्थापित
करण्यासाठी मदन भोसले यांच्या कार्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. माजी खासदार गजानन बाबर यांच्या माध्यमातून भाजपचा एक गट काही ठिकाणी सक्रिय आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांसमोर ठाकले होते. भारतीय जनता पक्षानेही उमेदवार उभे केले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील घवघवीत यशानंतर राष्ट्रवादीचा वारू काँग्रेस रोखणार का? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावोगावी आपल्या गटाची सत्ता आणण्यासाठी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व आता तालुक्‍याच्या राजकारणात नव्याने शिरकाव केलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांत चढाओढ सुरू आहे. पडद्यामागील हालचाली गतिमान झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे गावपातळीवरील सत्ताधारी, विरोधी गटांच्या बैठकांना सुरवात झाली आहे.

प्रत्येक वॉर्डनुसार मतदारांची नावे, मोबाईल नंबर मिळवले जात आहेत. वाड्या-वस्त्यांवर शोध घेवून एसएमएस, व्हॉट्‌सॲप, फेसबुकच्या माध्यमाव्दारे मतदारांची माहिती घेऊन गाव, प्रभागनिहाय राजकीय स्थितीचा अंदाज घेत संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पक्षीय वर्चस्वासाठी प्रत्येक गटातील कार्यकर्त्यांत चुरस निर्माण झाली आहे.

सरपंचपदाचा उमेदवार निवडताना नेत्यांचा कस
यंदा प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत कमालीची उत्सुकत्ता आहे. सरपंचपदाचा उमेदवार ठरवताना नेत्यांचा कस लागणार आहे, असे सध्या तरी चित्र आहे. थेट सरपंचपदामुळे आतापासूनच निवडणुकीत रंग भरण्यास सुरवात झाली आहे. दोन्ही पक्षांकडे अनेक जण इच्छुक आहेत. उमेदवार निश्‍चित करताना नेत्यांबरोबर गावपातळीवरील नेत्याची कसोटी लागणार आहे. उमेदवारीवरून बंडखोरी होऊ नये, यासाठी सरपंचपदाचा उमेदवार हा संबंधित गटातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेवूनच ठरवावा लागणार आहे. उमेदवाराचे राजकीय वलय, स्थानिक पातळीवरील गटा-तटाचे, भावकीचे राजकारण यावरच उमेदवारीचे भवितव्य ठरणार आहे. 

Web Title: satara news grampanchyat election