डीपी जळाल्याने निर्यातक्षम द्राक्षे संकटात 

अंकुश चव्हाण
मंगळवार, 9 जानेवारी 2018

कलेढोण - बेलेवाडी, दबडेमळा, आतकरीमळा व मुळीकवाडीतील भुषारी वस्तीवरील 15 दिवसांपासून डीपी जळाल्याने सुमारे 200 एकर क्षेत्रातील निर्यातक्षम द्राक्षांना पाणीपुरवठा करता येत नसल्याने द्राक्षासह, ज्वारी, हरभरा, मका ही पिके संकटात सापडली आहेत. विहीर व बोअरवेलवर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असणाऱ्या ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. दुसरा डीपी बसविण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणकडे पैसे भरूनही तो उपलब्ध होत नसल्याने संतप्त शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

कलेढोण - बेलेवाडी, दबडेमळा, आतकरीमळा व मुळीकवाडीतील भुषारी वस्तीवरील 15 दिवसांपासून डीपी जळाल्याने सुमारे 200 एकर क्षेत्रातील निर्यातक्षम द्राक्षांना पाणीपुरवठा करता येत नसल्याने द्राक्षासह, ज्वारी, हरभरा, मका ही पिके संकटात सापडली आहेत. विहीर व बोअरवेलवर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असणाऱ्या ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. दुसरा डीपी बसविण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणकडे पैसे भरूनही तो उपलब्ध होत नसल्याने संतप्त शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

खटाव तालुक्‍यातील कलेढोण भाग द्राक्ष निर्यातीतून देशाला परकीय चलन मिळवून देतो. पुरेशा पावसाने हजेरी लावल्याने पिके जोमात आली असून, ती ऐन भरात आली आहेत. या पिकांना शेवटच्या टप्प्यात पाण्याची गरज असताना वारंवार डीपी जळत असल्याने शेतकऱ्याना पिकांना पाणी देता येत नाही. कलेढोण भागातील बेलेवाडी, दबडेमळा, आतकरीमळा व भुषारी वस्तीवरील डीपी 15 दिवसांपासून जळाले आहेत. साळुंखे मळ्यातील डीपी तीन वेळा जळाल्याने डीपीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

द्राक्षातील साखरेवर परिणाम 
डीपी जळाल्याने डीपीमधून मिळणाऱ्या विजेवर शेतीचे पंप चालतात. त्यावर सुमारे 200 एकरांतील निर्यातक्षम द्राक्षबागा, ज्वारी, हरभरा, मकासह आदी पिके सुकून चालली आहेत. वेळेवर पाणी न मिळाल्याने द्राक्षांची फुगवन न होणे, सुकवा येणे, पाने पिवळे पडणे, साखर न वाढणे असे परिणाम होत असल्याचे अनिल दबडे यांनी सांगितले. 

डीपीच्या दर्जाबाबत शंका 
येथील दबडे मळ्यातील डीपी हा आजवर दोन वेळा जळाला, तर तिसऱ्यावेळी बसविल्यानंतर तो अवघ्या तीन तासांतच जळाला. त्यामुळे डीपीच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण होत आहे. "महावितरण' ज्या एजन्सीकडे तो दुरुस्तीसाठी पाठवतो त्याच्या दर्जाचीही खात्री करायला हवी आहे. शेतकऱ्यांची पिके ऐन भरात असल्याने वारंवार डीपीच्या जळाल्याने शेतीस पाणी देता नाही. 

"महावितरण'चे वीज चोरीकडे दुर्लक्ष 
ज्या भागातील डीपीवर शेती पंपाची जादा जोडणी आहे. त्या ठिकाणी नव्याने डीपी बसवून समांतर वीज वितरण करण्यासाठी डीपीवरील जादा भार कमी करण्याची गरज आहे. ज्या डीपीवरून वीज चोरी होऊन त्यावरील दाब वाढत आहेत. त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. 

जनरेटर, इंजिनाची धडधड सुरू 
विजेच्या पंपाला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जनरेटर, इंजिनाची सोय केली आहे. त्यासाठी जुन्या इंजिनची दुरुस्तीचा व इंधनावरील खर्च वाढल्याने आर्थिक बजेट कोलमडले आहे. 

पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण 
ज्या वृद्ध शेतकऱ्याची मुले पुण्या- मुंबईला शिक्षणासाठी व नोकरीसाठी बाहेर आहेत. त्या घरातील वृद्धांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहेत. दारात विहीर, बोअरवेल असूनही त्यांना विजेच्या अभावामुळे पिण्याच्या पाण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहेत, असे मुंबईकर ग्रामस्थ रमेश दबडे- पाटील यांनी नमूद केले. 

भूषारी वस्तीवरील डी. पी. जळून 11 दिवस झाले. डीपीचे पैसेही भरले. मात्र, अजूनही डीपी बसविलेला नाही. "महावितरण'ने गांभीर्याने लक्ष देऊन डीपी बसवावा 
- जगन्नाथ भूषारी, शेतकरी, भूषारी वस्ती 

माझ्यावर वेगळी ऍथॉरटी आहे. एक्‍सक्‍लुसिव्ह इंजिनिअर ते देणारे आहेत. तालुक्‍यात डीपी फेल्युअर जास्त असल्याने वेळ लागेल. 
- श्री. कोंडगुळे, उपअभियंता, महावितरण, वडूज

Web Title: satara news grapes