हेल्मेट प्रबोधनाबरोबरच वाहतूक सुरक्षा उपाय गरजेचे

श्रीकांत कात्रे
रविवार, 16 जुलै 2017

जगणे आणि मरणे यात फक्त एका श्‍वासाचे अंतर असते. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक धक्कादायक घटना आजूबाजूला आपण पाहतो. त्यातून बोध घेऊन आपण आपली वाट चालायची असते; परंतु आपल्याबाबतीत असे काही घडूच शकत नाही, असा फाजील आत्मविश्‍वास अनेकांना असतो. त्यामुळे बेफिकिर वृत्तीने दुर्लक्ष करण्याची मानसिकताही असते. ही मानसिकता बदलायला हवी. विशेषतः हेल्मेट वापराबाबत आता स्वतःच पुढाकार घ्यायला हवा. कोणत्याही गोष्टीची सक्ती केली, की त्याविरुद्ध बंड करण्याची माणसाची प्रवृत्ती असते; पण कोणतीही गोष्ट मनापासून करायची ठरविली, तर त्यात यश मिळते. शहरांमधील रस्त्यावरची हेल्मेटसक्ती टळली आहे.

जगणे आणि मरणे यात फक्त एका श्‍वासाचे अंतर असते. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक धक्कादायक घटना आजूबाजूला आपण पाहतो. त्यातून बोध घेऊन आपण आपली वाट चालायची असते; परंतु आपल्याबाबतीत असे काही घडूच शकत नाही, असा फाजील आत्मविश्‍वास अनेकांना असतो. त्यामुळे बेफिकिर वृत्तीने दुर्लक्ष करण्याची मानसिकताही असते. ही मानसिकता बदलायला हवी. विशेषतः हेल्मेट वापराबाबत आता स्वतःच पुढाकार घ्यायला हवा. कोणत्याही गोष्टीची सक्ती केली, की त्याविरुद्ध बंड करण्याची माणसाची प्रवृत्ती असते; पण कोणतीही गोष्ट मनापासून करायची ठरविली, तर त्यात यश मिळते. शहरांमधील रस्त्यावरची हेल्मेटसक्ती टळली आहे. मात्र, आपण एक जागरूक नागरिक म्हणून स्वतःच स्वतःला हेल्मेट घालण्याची सक्ती करायला हवी. 

वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्‍न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. रस्त्यावरील वाहने वाढत आहेत. रस्त्यांची स्थिती, वाहनांची गर्दी, वेग आणि इतर अनेक कारणांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढतेच आहे. रस्त्यावरील बळींची संख्या वाढते आहे. अनेक जायबंदी होत आहेत. अशा वेळी सुरक्षिततेच्या उपायांची अंमलबजावणी प्रत्येकाने करण्याची गरज आहे. मी हळू आणि व्यवस्थित वाहन चालवतो, असे म्हणून चालत नाही. समोरून येणारे वाहन कसे येते, ते सांगता येत नाही. त्यामुळेच सुरक्षिततेची गरज जास्त असते. सुरक्षेच्या उपायांचा एक भाग हेल्मेट आहे. जीवघेण्या अपघाताच्या वेळी हेल्मेट आपले डोके शाबूत ठेवते, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची ठरते. खरं तरं हेल्मेट अशा प्रसंगात जीवदानच देते. अवतीभवती घडणाऱ्या घटनेतून एवढे तरी शिकले पाहिजे. जोपर्यंत आपणावर वेळ येत नाही, तोपर्यंत आपण स्वतःला सुरक्षितच समजत असतो; पण हा गैरसमज वेळ आल्यावरच दूर होतो.

कोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांनी कार्यक्षेत्रांतील पाच जिल्ह्यांत हेल्मेटसक्ती निर्णय जाहीर केला. त्याची अंमलबजावणी होणार म्हणून लोक अस्वस्थ झाले. हेल्मेट वापराला शहरात किती अडचणी असतात, याचा पाढाच लोकांनी वाचायला सुरवात केली. महामार्गावर किंवा राज्य रस्त्यांवर हेल्मेटसक्ती करावी; परंतु शहरातील रस्त्यावर नको, अशी लोकभावना व्यक्त होऊ लागली. या लोकभावनेचा ‘सकाळ’ने पाठपुरावा करून व्यवहार्य पर्यायासाठी प्रयत्न केले. ही लोकभावना श्री. नांगरे- पाटील यांच्यापर्यंत पोचवली. त्यावर सकारात्मक भूमिका घेत त्यांनी हेल्मेटसक्ती शहरात न करण्याचा निर्णय घेतला. ‘सकाळ’ने श्री. नांगरे- पाटील यांची सकारात्मक भूमिका प्रसिद्ध केली. ‘सकाळ’च्या पाठपुराव्यामुळे लोकांना दिलासा मिळाला. शहरातील नागरिकांना हेल्मेटचा संभाव्य त्रास टळला. असे असले तरी हेल्मेट वापराचे महत्त्व आहेच. महामार्गावर तर हेल्मेटचा वापर करायलाच हवा. शहरातही हेल्मेट वापराबाबत सवय करण्याची मानसिकता वाढवली पाहिजे. सक्तीच्या निर्णयात शहरापुरती शिथिलता मिळाली, या संधीचा फायदा घेऊन आता प्रत्येकाने स्वतःच्या सुरक्षितेतेसाठी हेल्मेट वापरण्याकडे पाऊल उचलले पाहिजे. 

पोलिसांनी शहरात सक्ती करण्याचा निर्णय मागे घेतला. हेल्मेट वापराबाबत प्रबोधन करण्याचे ठरविले. प्रबोधनाची आवश्‍यकताही आहे. वाहतूक सुरक्षित होण्यासाठी प्रशासनाने जे- जे करायला हवे त्याचा तो एक भाग आहे; परंतु फक्त तेवढ्यावरच थांबता कामा नये. आपल्याला शिस्त लावायचीय तर ती मुळापासून लावली पाहिजे. वाहतूक सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर वाढवायला हवा. त्याबरोबरच इतर उपायांकडेही प्रशासनाने लक्ष द्यायला हवे. लोकांनी हेल्मेट वापरायला सुरवात केली, तरी अपघात होऊच नये म्हणून ज्या सुविधा गरजेच्या आहेत, त्या देण्यासाठी तत्परता दाखविली पाहिजे. हा विषय फक्त पोलिस प्रशासनाचा नाही. मात्र, इतर विभागांशी समन्वय साधत या उपायांची पूर्तता करणे आवश्‍यक ठरते. रस्त्यांची स्थिती सुधारण्यापासून सूचनाफलकांपर्यंत अनेक बाबी त्यात येतात. सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नगरपालिका यासारख्या इतर विभागांच्या मदतीने पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराने असे उपाय आखले तरच वाहतूक सुरक्षित होईल. त्यामुळे जखम काय आहे, हे पाहून इलाज करण्याची पद्धत अंमलात आली पाहिजे. सक्ती करून लोकभावना विरोधात जाण्यापेक्षा लोकांत प्रबोधन करून प्रत्येक विभागाने फक्त आपले काम चोखपणे केले, तरी लोकांचे जगणे सुसह्य होणार आहे. महामार्गावर हेल्मेटसक्तीची गरज आहे. शहरात वाटत नसली, तरी शेवटी वेळ सांगून येत नाही. प्रत्येकाने किमान स्वतःच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच निर्णय घेण्याची आवश्‍यकता आहे.

Web Title: satara news Helmets need traffic safety measures along with the awakening