आंतरशालेय मैदानी स्पर्धांना स्थगिती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

सातारा - सततच्या पावसामुळे छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात झालेले निसरडे मैदान, मुख्य मैदानावर साचलेले पाणी त्यातच सुरू असलेल्या आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धा अन्‌ त्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नियोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम स्थगित केला आहे. 

सातारा - सततच्या पावसामुळे छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात झालेले निसरडे मैदान, मुख्य मैदानावर साचलेले पाणी त्यातच सुरू असलेल्या आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धा अन्‌ त्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नियोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम स्थगित केला आहे. 

जिल्हा क्रीडा परिषद तसेच जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे विविध खेळांच्या तालुका तसेच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत. जिल्ह्यातील महाबळेश्‍वर, सातारा, जावळी तालुक्‍यांच्या आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धा निश्‍चित वेळापत्रकानुसार घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत येथील क्रीडा संकुलात सातारा तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा झाल्या. जावळी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा होणार होत्या. गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे क्रीडा संकुलातील मैदाने निसरडी झाली होती. काही ठिकाणी पाण्याची डबकी, तर काही मैदानांची स्थिती तळ्यांसारखी झाली होती. कोल्हापूर विभागीय (27 ते 29 सप्टेंबर) आणि नागपूर येथे तीन ऑक्‍टोबरला राज्यस्तरीय स्पर्धांच्या तारखा निश्‍चित असल्याने क्रीडा विभागाने क्रीडा शिक्षकांच्या संमतीने स्पर्धा उरकल्या. यासंदर्भात दै. "सकाळ'ने मैदानांची स्थिती आणि त्यामुळे खेळाडूंच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम याचे सचित्र वृत्त प्रसिद्ध करून खेळाडूंच्या मनातील भावनांना वाट करून दिली. परिणामी, जावळी तालुकास्तरीय तसेच 22 ते 24 सप्टेंबर कालावधीत होणाऱ्या जिल्हास्तरीय आंतरशालेय स्पर्धा तात्पुरत्या पुढे ढकलल्या. त्याबाबतची माहिती जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना क्रीडा कार्यालयातून कळविण्यात येत होती. 

राज्यस्तरीय स्पर्धांच्या तारखा पुढे? 
जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीची कल्पना देत नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धांच्या नियोजित तारखांमध्ये बदल करावा, अशी विनंती जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील यांनी नागपूरच्या उपसंचालकांना केली. दमदार पावसाची परिस्थिती अन्य जिल्ह्यातही होती. त्यानुसार राज्यस्तरीय स्पर्धांच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.

Web Title: satara news Inter School Tournament