सततच्या पावसाने गुळ हंगाम दीडमहिने लांबला

हेमंत पवार
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

साखर कारखान्यांचेही दर चांगले 
साखर कारखान्यांकडुनही शेतकऱ्यांच्या ऊसाला गेल्या दोन ते तीन वर्षापासुन चांगला दर मिळु लागला आहे. शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांच्यावर दर मिळत असल्याने काही शेतकऱ्यांनी ऊसाचे गुऱ्हाळ करण्याएेवजी साखर कारखान्यांनाच ऊस घालण्यास पसंती दिली आहे. त्याचाही परिणाम हंगामावर झाल्याचे गुऱ्हाळ मालकांनी सांगितले.

कऱ्हाड : सततच्या वादळी पावसाने आणि दिवाळीमुळे मजुरच न आल्याने यंदा गुऱ्हाळांचा हंगामही लांबला आहे. सप्टेंबरमध्ये सुरु होणारी गुऱ्हाळे यंदा दिवाळीनंतच पुर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील गुळाची आवक थंडावली असुन नवीन गुळ विक्रीस न आल्याने गुळाचे दरही वाढलेलेच आहेत. 

साखर कारखान्याचा हंगाम सुरु होण्याची वाट पहात न बसता शेतकरी शेत जमीन दुसऱ्या पिकासाठी लवकर मोकळी करण्यासाठी ऊसाचे गुऱ्हाळ करतात. गेल्या तीन ते चार वर्षापासुन गुळाला चांगला दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊसतोडीची वाट पहात न बसतान गुऱ्हाळघराची तोड घेवुन ऊसाचे गुऱ्हाळ केले. त्याचबरोबर गुळाचे पैसे शेतकऱ्यांना महिनाभराच्या अंतराने एकरकमी मिळत असल्याने गरजा भागतात. साखर कारखान्याच्या पैशासारखे वाट पहात बसावी लागत नसल्यानेही शेतकरीही ऊसाचे गुऱ्हाळ करतात. यंदा मात्र सततच्या वादळी पावसाचा फटका बसला आहे. गेल्या पंधरा दिवसापासुन सतत पाऊस पडत असल्याने गुऱ्हाळे सुरु करण्यासाठी मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

त्याचबरोबर दिवाळीही तोंडावर आल्याने मजुर दिवाळीनंतरच येतील. सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपच गुऱ्हाळे सुरु आहेत. त्यामुळे दरवर्षी सप्टेंबरमध्ये सुरु होणारी गुऱ्हाळे यंदा दिवाळीनंतरच पुर्ण क्षमतेने सुरु होतील असे दिसते. त्यामुळे बाजारपेठेतील गुळाची आवक थंडावली असुन नवीन गुळ विक्रीस न आल्याने गुळाचे दरही वाढलेलेच आहेत. सध्या बाजारपेठेत गुळाचा ३ हजार ६०० ते ४ हजार ११० रुपये क्विंटलला दर आहे. मात्र आवक किरकोळच होत असल्याने व्यापाऱ्यांपुढेही प्रश्नच आहे. 

साखर कारखान्यांचेही दर चांगले 
साखर कारखान्यांकडुनही शेतकऱ्यांच्या ऊसाला गेल्या दोन ते तीन वर्षापासुन चांगला दर मिळु लागला आहे. शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांच्यावर दर मिळत असल्याने काही शेतकऱ्यांनी ऊसाचे गुऱ्हाळ करण्याएेवजी साखर कारखान्यांनाच ऊस घालण्यास पसंती दिली आहे. त्याचाही परिणाम हंगामावर झाल्याचे गुऱ्हाळ मालकांनी सांगितले. 

उलाढालही ठप्प
कऱ्हाडच्या गुळाला दिल्ली, हरियाना, गुजरात, उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्यांकडुन मागणी होते. दरवर्षी सप्टेंबरपासुन गुळाची आवक सुरु झाल्यावर येथील व्यापाऱ्यांकडुन गुळ तिकडे पाठवला जातो. त्यातुन मोठी उलाढाल होते. यंदा मात्र हंगामच दीड महिने लांबला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची उलाढालच ठप्प झाली आहे.

Web Title: Satara news Jaggery session in Karhad