जिहे-कठापूरची मान्यता श्रेयवादात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

सातारा - पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्‍ट’मध्ये समाविष्ट असलेल्या जिहे- कठापूर योजनेला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली; पण याचे श्रेय घेण्यावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्यात सध्या हा श्रेयवाद बोकाळला आहे; परंतु ही योजना पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी पोचेल तो दिवस खरा आनंदोत्सव साजरा करण्याचा असणार आहे, हे दोन्हीकडच्या नेतेमंडळींनी ध्यानात घ्यायला हवे.

सन १९९७ मध्ये युती शासनाच्या काळात खटाव, माण या दुष्काळी तालुक्‍यांच्या शेती पाण्याचा प्रश्‍न सुटावा, यासाठी जिहे- कठापूर उपसा सिंचन योजना हाती घेण्यात आली. सुरवातीला या योजनेचा खर्च २६९ कोटी रुपये होता. त्यानंतर सत्ताबदल झाला आणि सत्तेत आलेल्या आघाडी शासनाने या योजनांच्या कामांकडे दुर्लक्ष केले. पालकमंत्री श्री. शिवतारे यांनी ही योजना त्यांचा ‘ड्रिम प्रोजेक्‍ट’ असल्याचे जाहीर केले होते, तर नरेंद्र मोदींचे गुरू (कै.) लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टने सातत्याने या योजनेला केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळावा म्हणून पाठपुरावा केला.

निधीच्या गर्तेत सापडलेल्या या योजनेचा खर्च २६९ कोटींवरून एक हजार ८५ कोटींवर गेला. हा प्रकल्प अनुशेषांतून बाहेर काढणे आणि सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्‍यक होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत सर्वांनी प्रयत्न सुरू ठेवले होते. या प्रयत्नाला काल यश आले. केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली. याचा आनंदोत्सवही भाजपच्या वतीने साजरा करण्यात आला, तर शिवसेनेच्या नेत्यांनी या योजनेस मान्यता न मिळाल्यास जलसंपदा विभागाची कार्यालये पेटवून देण्याचा इशारा दिलेला होता. अखेर दिल्लीत या योजनेस मान्यता मिळाली. सोबत ८०० कोटींचा तातडीने निधी उपलब्ध केला. 

आता ही योजना कार्यान्वित होऊन तिचे पाणी खटाव, माणच्या शिवारात पोचण्याची आशा शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे, पण त्या आधी या योजनेसाठी कोण झटले यावरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांत श्रेयवाद रंगला आहे. तब्बल २१ वर्षे रखडलेल्या योजनेचे काम पुन्हा सुरू होणार आहे; पण ज्यावेळी या योजनेचे पाणी माण, खटावमधील शेतकऱ्यांच्या शिवारात पोचेल त्याच वेळी खऱ्या अर्थाने शेतकरी आनंदीत होणार आहे. तोच आनंदाचा दिवस प्रत्यक्षात येण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

श्रेयवादाच्या भांडणात...
श्रेयवादाच्या भांडणात पुन्हा या प्रकल्पाच्या कामाकडे दुर्लक्ष होऊन शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडण्याची भीती आहे. त्यामुळे भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी श्रेयवाद टाळून योजनेचे काम चांगल्याप्रकारे होऊन शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी पोचण्यासाठी जोर लावला पाहिजे. 

Web Title: satara news jihe kathapur scheme