कासमधील पाणी दूषित होण्याचा धोका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

कास - कास तलावावर ओल्या- सुक्‍या पार्ट्या झोडून किनाऱ्यालगत टाकलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांच्या काचा, जेवणाची भांडी तलावातील पाण्यात धुणे, तलावातील पाण्यात सर्रास वाहनांचे होत असलेले "वॉशिंग', तसेच सध्या तलावाच्या पाणी पातळी खालावल्याच्या पार्श्‍वभूमीवर भरदिवसा राजरोसपणे सुरू असलेल्या मासेमारीमुळे तलावातील पाणी दूषित होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

कास - कास तलावावर ओल्या- सुक्‍या पार्ट्या झोडून किनाऱ्यालगत टाकलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्यांच्या काचा, जेवणाची भांडी तलावातील पाण्यात धुणे, तलावातील पाण्यात सर्रास वाहनांचे होत असलेले "वॉशिंग', तसेच सध्या तलावाच्या पाणी पातळी खालावल्याच्या पार्श्‍वभूमीवर भरदिवसा राजरोसपणे सुरू असलेल्या मासेमारीमुळे तलावातील पाणी दूषित होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या कास पठारालगत असणाऱ्या, तसेच सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावावर उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू असल्याने शाळा, महाविद्यालयीन तरुणाई व असंख्य पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. दुपारच्या वेळी उन्हाच्या तीव्र झळा असह्य करत असल्याने तलावात कित्येक पर्यटक जलविहाराचा आनंद घेताना दिसत आहेत. तलावाच्या परिसरात ओल्या- सुक्‍या पार्ट्या देखील मोठ्या प्रमाणावर झोडल्या जात आहेत. त्यामध्ये काही जण बिअर, व्हिस्कीचे पेग रिचवून दारूच्या बाटल्या तेथेच फोडत असल्यामुळे तलावाच्या परिसरात काचांचे तुकडे पडलेले दिसत आहेत. त्यामुळे पाण्यातील जलचर, तसेच पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वन्य पशुपक्षांना इजा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पार्ट्या झोडल्यानंतर थर्मोकॉल डिशेस, ग्लास, प्लॅस्टिक पिशव्यांचा खच तेथेच टाकला जात असून, परिसराला कचऱ्याचा विळखा पडल्याची परिस्थिती निर्माण लागली आहे. त्याचबरोबर पार्ट्या झोडताना वापरण्यात आलेली भांडी तलावातील पाण्यातच धुतली जात असल्याने साबणाचा फेस तलावातील पाण्यावर तरंगताना दिसत आहे. कित्येक पर्यटक आपापली वाहने तलावाच्या किनाऱ्यालगत आणून "वॉशिंग' करत असल्याने ग्रीस, ऑइल, तसेच गाड्या धुण्यासाठी केलेला डिटर्जंटचा फेस यामुळे पाणी दूषित होण्याच्या मार्गावर आहे. भरदिवसा राजरोसपणे होत असलेल्या बेकायदेशीर मासेमारीमुळे पाणी कमी प्रमाणात निवळले जाऊ शकते. या सर्व घटनांवर निर्बंध बसावेत, यासाठी पालिकेकडून उपाययोजना होऊन सुरक्षा रक्षकाची कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी, पर्यटकांतून होत आहे. 

""कास तलावातील मासे कमी झाल्यास बेडूक व इतर तत्सम कीटक कृमींची पाण्यातील संख्या वाढून पाणी दूषित होण्याचा धोका असून, कास तलावाच्या संरक्षणाच्या दृष्टीने योग्य उपाययोजना व्हाव्यात.'' 
- श्रीरंग शिंदे, वनपाल, बामणोली 

Web Title: satara news kaas water