ऊसतोडी रोखून सातारा जिल्ह्यात आंदोलनाचा श्रीगणेशा

हेमंत पवार
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूर येथे ऊस परिषद झाली. तिथे उसाला पहिला हप्ता ३ हजार ४०० रुपये द्या अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने FRPमध्ये अधिक ३०० रुपयांची मागणी केली आहे. पंजाबराव पाटील यांच्या बळीराजा शेतकरी संघटनेची ३ हजार ५०० रुपये पहिल्या हप्त्याची मागणी आहे.

कऱ्हाड : ऊसाच्या पहिल्या हप्त्यासाठी शेतकरी आंदोलनाची धग हळूहळू वाढू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पार्ले येथील ऊसतोडी रोखून जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा श्रीगणेशा केला. पहिला हप्ता जाहीर झाल्याशिवाय ऊसतोड करु नये असा पवित्रा संघटनेने घेतला आहे. त्यामुळे आंदोलनाची धास्ती ऊसतोड मजुरांनी घेतल्यामुळे सध्या काही ठिकाणी ऊसतोडी बंद ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी मजुरांवर बसून राहण्याची वेळ आली असून, त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना त्यांनी घाम गाळून पिकविलेल्या ऊसाला चार पैसे जादाचे मिळावे यासाठी शेतकरी संघटनांकडून आंदोलनाचे हत्यार उपसले जाते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूर येथे उस परिषद झाली. तिथे उसाला पहिला हप्ता ३ हजार ४०० रुपये द्या अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने FRPमध्ये अधिक ३०० रुपयांची मागणी केली आहे. पंजाबराव पाटील यांच्या बळीराजा शेतकरी संघटनेची ३ हजार ५०० रुपये पहिल्या हप्त्याची मागणी आहे. त्यामुळे सध्या पहिल्य हप्त्यासाठी चांगलेच रान तापले आहे. पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय साखर कारखान्यांनी ऊसतोड करु नये व शेतकऱ्यांनीही ती घेऊ नये असा पवित्रा घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे व कार्यकर्त्यांनी दोनच दिवसापुर्वी पार्ले येथील ऊसतोड रोखल्याने ऊसदर आंदोलनाची त्यामाध्यमातुन ठिणगी पडली. त्यामुळे दोन दिवसापासुन काही ठिकाणी ऊसतोड मजुरांनीच ऊसतोडी बंद ठेवल्या आहेत. त्यांनीही आंदोलनाची धास्ती घेतल्याने त्यांच्यावर बसुन राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.   

शेतकऱ्यांचेही नुकसान 
ज्या ठिकाणी ऊस तोडी थांबल्या आहेत त्यापैकी काही शिवारात ऊस तसाच पडुन आहे. शेतकरी संघटनांनी पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करु नये असे जाहीर केले आहे. त्यामुळे काही ठिकाणी स्वतः मजुरांनी तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनीच तोडी बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे तोडलेला ऊस शेतातच पडुन असल्याने शेतकऱ्यांचेही काही प्रमाणात नुकसान होत आहे. 

Web Title: satara news karad farmers sugarcane agitation