कृष्णा-कोयनेत मिसळणारे सांडपाणी तातडीने थांबवा

हेमंत पवार
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

प्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या पालिकेला सुचना ः सांडपाणी प्रकल्पही पुर्ण क्षमतेने चालवण्याच्या सुचना

प्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या पालिकेला सुचना ः सांडपाणी प्रकल्पही पुर्ण क्षमतेने चालवण्याच्या सुचना

कऱ्हाड (सातारा): शहराजवळून वाहणाऱ्या कृष्णा-कोयना नद्यांच्या पाण्यामध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे पाणी प्रदुषणात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याची चवही बदलली होती. त्याची बातमी प्रसिध्द झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट देवुन सांडपाणी प्रक्रीया केंद्र व सांडपाणी मिसळणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. त्याचबरोबर त्यांनी पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेतले आहेत. नदीत मिसळणारे सांडपाणी तातडीने थांबवण्याच्या सुचना पालिकेला करण्यात आल्या असून सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पही पुर्ण क्षमतेने चालवून पाणी नदीत मिसळणार नाही, अशी कार्यवाही करा अशा सुचना पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्याची माहिती प्रदुषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी बी. एम. कुकडे यांनी सांगितले.

टेंभुसाठी कृष्णा नदीचे पाणी अडवल्याने आणि त्यातच सांडपाणी मिसळत असल्याने कऱ्हाड शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची चव बदलली. त्यामुळे नागरिकांसह आबालवृध्दांमध्ये पिण्याच्या पाण्याविषयी शंका निर्माण झाली. पाणी पिण्यायोग्य आहे की नाही या धास्तीने अनेकांनी शुध्द पाण्याच्या बाटल्या आणून पाणी पिण्यास सुरुवात केली. मात्र, ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे त्यांनी मात्र आहे त्याच पाण्यावर गुजरान सुरु ठेवली. त्यासंदर्भात पालिकेत तक्रारीही झाल्या. त्याची दखल घेवुन नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे व काही नगरसेवकांनी प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांच्याकडे त्यासंदर्भातील माहिती देवुन पाणी सोडण्यासाठीची कार्यवाही करण्याची विनंती केली. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी टेंभुच्या अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगीतल्यावर पाणी सोडण्यात आले. मात्र, खरा प्रश्न पाणी सोडण्याचा नाही तर त्यामध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्याचा आहे. तालुक्यातुन कृष्णा-कोयना या दोन नद्या वाहतात. त्या दोन्ही नद्याकडेच्या गावांतील सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळते. गेल्या अनेक वर्षापासुन तीच स्थिती आहे. शहरामधील सांडपाणीही थेट कृष्णा-कोयना नद्यामध्ये मिसळते. त्यामुळे नदीच्या प्रदुषणात मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर कृष्णा नदीचे पाणी टेंभु येथे आडवण्यात आल्यामुळे नदीचा प्रवाह थांबला आहे. त्यातच संबंधित सांडपाणी मिसळत असल्याने पाण्याच्या प्रदुषणात मोठी वाढ झाली आहे. परिणामी पाण्याची चव बदलुन नागरिकांना तेच पाणी प्यावे लागले.

यासंदर्भात बातमी प्रसिध्द झाली. त्याची दखल घेवुन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी प्रशांत भोसले यांनी येथे भेट देवुन पाहणी केली. पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी ए. आऱ. पवार, एन्व्हायरो क्लबचे अध्यक्ष प्रा. जालींदर काशिद, मनसेचे सागर बर्गे यांच्यासह अधिकाऱ्यांनी आज पाणी प्रदुषणाच्या अनुशंघाने सांडपाणी प्रक्रीया केंद्र, पंपींग स्टेशन, जेथे सांडपाणी नदीत मिसळते आदि ठिकाणी भेट देवुन पाहणी केली. त्यानंतर सकाळशी बोलताना श्री. म्हणाले,  'सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालवला पाहिजे. सांडपाणी पाणी जादा होवुन ते नदीत मिसळु नये यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे. सध्या कारखाने बंद आहेत. त्यामुळे त्यांचे सांडपाणी नदीत मिसळून पाण्याची चव बदलली असे म्हणता येत नाही. मुख्यतः शहरातीलच सांडपाणी नदीत मिसळत आहे. त्याचबरोबर टेंभुसाठीही पाणी अडवण्यात येत असल्याने सांडपाणी मिसळुन राहुन पाण्याची चव बदलली असावी. त्यामुळे सांडपाणी मिसळणे तातडीने थांबवणे गरजेचे आहे, अशा सुचना पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना पत्र देवून त्यांच्याकडून त्यावरील कार्यवाहीचाही अहवाल मागवण्यात येईल.'

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: satara news karad krishna koyna water issue