अंगावर वीज पडून नववीतील विद्यार्थी जागीच ठार

सचिन शिंदे
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

डोंगरातून घराकडे जनावरे घेऊन येत असताने प्रतिकच्या अंगावर वीज पडल्याने तो जागीच ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

कऱ्हाड : डोंगरात जनावरे चारण्यासाठी घेऊन गेलेल्या मनव येथील नववीतील विद्यार्थ्याच्या अंगावर वीज पडून तो जागीच ठार झाल्याची घटना आज (रविवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. प्रतिक अनिल गोसावी असे त्याचे नाव असुन त्याच्या मृत्युने  परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

प्रतिक हा नांदगाव येथील   हायस्कुलमध्ये नोकरीस असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. तो सध्या नववीच्या वर्गात शिकतो. रविवार सुट्टी असल्याने तो मनवपासुन सुमारे तीन ते चार किलोमीटरवरील डोंगरात जनावरे चारण्यासाठी गेला होता. डोंगराच्या परिसरात अन्य काही जणही जनावरे चारण्यासाठी आले होते.सायंकाळी वादळी वाऱ्यासह वीजांच्या कडकाटात अचानक पावसास सुरुवात झाली. डोंगरातून घराकडे जनावरे घेऊन येत असताने प्रतिकच्या अंगावर वीज पडल्याने तो जागीच ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

वीजेचा लोळ प्रतिकच्या अंगावर पडुन मोठा आवाज झाल्याने त्या परिसरात जनावरे घेऊन आलेल्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी लगेच याची माहिती प्रतिकच्या कुटुंबीयांना, ग्रामस्थांना दिली. त्यावर कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी तिकडे धाव घेतली. त्यादरम्यान ग्रामस्थांनीही तालुका पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रितसर पंचनाम्या नंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. त्याच्या मृत्युने त्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: satara news karad lightening kills a student