प्लॅस्टिकला प्रतिबंध, निसर्गरक्षकाची नेमणूक करा!

प्लॅस्टिकला प्रतिबंध, निसर्गरक्षकाची नेमणूक करा!

सातारा - शालेय व महाविद्यालयीन युवकांमध्ये निसर्गातील वर्तनाबद्दल प्रबोधन करावे. तलाव परिसरात जाणाऱ्या पर्यटकांना प्लॅस्टिक सोबत नेण्यावर प्रतिबंध घालावा. सुरक्षा रक्षकाच्या धर्तीवर कासमध्ये स्थानिकांच्या मदतीने पगारी निसर्गरक्षकांची नेमणूक करावी. येणाऱ्या पर्यटकांकडून पर्यावरण शुल्क बसवून खर्च भागवावा. कासच्या स्वच्छतेबरोबरच त्याठिकाणी पुन्हा कचरा होणार नाही, यासाठी उपाययोजना करावी, अशा स्वरूपाच्या सूचना कास स्वच्छता मोहिमेच्या नियोजन बैठकीत नागरिकांतून आल्या. 

साताऱ्याचा मानबिंदू असलेला कास तलाव प्लॅस्टिक व इतर कचऱ्याच्या वेढ्यात अडकला आहे. याच तलावातून शहरास पाणीपुरवठा होत असल्याने कास तलाव परिसर स्वच्छ राहावा, या जाणिवेतून ‘सकाळ’ने लोकसहभागातून कासच्या स्वच्छतेची हाक दिली आहे. ‘सकाळ’च्या आवाहनास प्रतिसाद देत बुधवारी (काल) येथील ‘सकाळ’ कार्यालयात नागरिकांची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण सूचना नागरिकांनी मांडल्या. पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. निसर्गात गेल्यानंतर आपले वर्तन कसे असावे, याबद्दल कोठेच शिकवले जात नाही. ते शिकविण्याची गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे, अशी आग्रही मते नागरिकांनी मांडली. ‘सकाळ’ने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. कासवर प्रेम करणारा प्रत्येक सातारकर नागरिक या उपक्रमात सहभागी होऊन योगदान देईल, असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी व्यक्त झालेल्या महत्त्वपूर्ण सूचना पुढीलप्रमाणे -

प्रा. डॉ. विश्‍वास देशपांडे : कास पठार हे केवळ फुलांच्या बहरापुरते मर्यादित जागतिक वारसा जतनस्थळ नाही. तेथे कायमस्वरूपी काळजी घेणे आवश्‍यक आहे. 

श्रीकांत आंबेकर (पाणीपुरवठा सभापती, सातारा) : कासला कचराकुंड्यांत गोळा होणारा कचरा पालिकेच्या ठेकेदारामार्फत वेळच्या वेळी उचलण्याची व्यवस्था पालिकेमार्फत केली जाईल. 

डॉ. संदीप श्रोत्री : कासमध्ये प्लॅस्टिकबरोबरच रासायनिक कचरा कटाक्षाने टाळला पाहिजे. 

कन्हैयालाल राजपुरोहित (पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते) : कासच्या स्वच्छतेनंतर पुन्हा तेथे कचरा होऊ नये, याकरिता उपाययोजना असावी. 

सुनील भोईटे (मानद वन्यजीवरक्षक) : कास तलावापासून ठराविक अंतरावर रस्ते रोखावेत. उंचीवाढीनंतर पाण्याबाहेर राहणाऱ्या क्षेत्रात आताच नव्याने वृक्षारोपण करावे.

डॉ. शेखर मोहिते : विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना कासच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घ्यावे. जेणेकरून युवा पिढीवर स्वच्छतेचे संस्कार घडतील. 

रवींद्र सासवडे (नागरिक) : पोलिस, वन, पालिका व स्थानिक ग्रामस्थांची समिती नेमून कासचे व्यवस्थापन कायम राहील, अशी व्यवस्था करावी. 

शिरीष चिटणीस : या मोहिमेत शाळांचा सहभाग प्रबोधनात्मक असावा. व्याख्यान, निबंध-वक्तृत्व स्पर्धा आदींच्या माध्यमातून मुलांवर निसर्ग स्वच्छ ठेवण्यासाठी संस्कार रुजवता येतील.

कैलास बागल (गिर्यारोहक) : पर्यटकांना पाण्यापर्यंत जाण्यास मज्जाव असावा. पर्यटक क्षेत्र निश्‍चित करून द्यावे. त्याशिवाय इतरत्र जाण्यास प्रतिबंध असावा. पोलिस, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, वन विभाग व नगरपालिका यांनी एकत्र येऊन तेथील व्यवस्थापन करावे. तेथील हॉटेल्स, टपऱ्या व विक्रेते यांचा कचरा कोठे जातो हे तपासावे. 

उदय चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते) : कासमध्ये मर्यादेच्या पुढे वाहने जाणार नाहीत, अशी व्यवस्था करावी. 

जुलेखा बागवान (नागरिक) : कासकडे जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी व्हावी. मद्य, प्लॅस्टिक कागद-बाटल्या आदी गोष्टी तपासून मगच सोडावे. 

डॉ. दीपक निकम (जिल्हा परिषद मॉर्निंग ग्रुप) : कासमध्ये कचराकुंड्या ठेवण्यात याव्यात. कासमध्ये प्लॅस्टिकला पूर्णत: बंदी घालावी. 

गीता पाटील (ंसप्ततारा परिवर्तन संस्था, सातारा) ः सुरक्षा रक्षक असतात तसेच स्वच्छता रक्षक असावेत. कासमध्ये कचरा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. लोकांना कचरा ठेवण्यासाठी कचरा पेट्यांची उपलब्धता करून द्यावी.

अभियंता सुधीर चव्हाण (नागरिक) : कासचा निसर्ग टिकविण्याची सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे.

प्रशांत नलवडे (धर्मवीर युवा मंच) : वन विभाग आणि कास संवर्धन समिती यांनी कासमधील चुकीच्या गोष्टींवर नियंत्रण ठेवावे. या समितीला प्लॅस्टिक कचरा, रॅपर, बाटल्या जप्त करण्याचे अधिकार असावेत. 

विष्णू किर्दत (कास ग्रामस्थ) : कासचे सौंदर्य टिकवण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना संबंधित यंत्रनणांनी आखाव्यात. त्यासाठी आवश्‍यक सर्व सहकार्य स्थानिक ग्रामस्थ करतील. 

यावेळी ड्रोंगो संस्थेचे सुधीर सुकाळे, रानवाटाचे विशाल देशपांडे, तनिष्का कार्यकर्त्या डॉ. पल्लवी साठे, डॉ. बाळासाहेब जाधव यांनीही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे यांनी कास स्वच्छता मोहिमेची रुपरेषा मांडली. शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर यांनी आभार मानले. नगरसेविका सविता फाळके, हारुण बागवान, निखिल वाघ, अभिषेक शेलार, विकास किर्दत, दत्तातय किर्दत, सुधीर चव्हाण, एस. व्ही. सावंत, भारती जगताप, किरण मोरे आदी नागरिक उपस्थित होते.

कास अभियानास रविवारी प्रारंभ
‘सकाळ’ने हाती घेतलेला उपक्रम चांगला आहे. पर्यावरण वाचले तरच आपण वाचणार आहोत. त्यामुळे या चांगल्या कामाचा प्रारंभ येत्या रविवारी (ता. २१) करावा, असे या बैठकीत ठरले. रविवारी सकाळी साडेसात ते दहा या वेळात श्रमदान होईल. साडेदहा वाजता कास बंगल्याजवळ या अभियानाच्या प्रारंभाचा औपचारिक कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्याचे ठरले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com