घोंगावतेय ‘कास’चे संकट...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

पावसाअभावी पाणीसाठा साडेपाच फुटांवर; राखीव साठा उपसावा लागण्याची भीती

सातारा - गेल्या काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे साताऱ्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावते आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावात अवघा साडेपाच फूट पाणीसाठा शिल्लक आहे. येत्या काही दिवसांत पावसाने साथ न दिल्यास साताऱ्यावर पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची भीती आहे. 

शहराच्या पश्‍चिम भागातील सुमारे ७० हजार लोकसंख्येला कास तलावातून पाणीपुरवठा होतो. नेहमीप्रमाणे गेल्या वर्षी तलाव भरून वाहिला असला तरी जूनच्या मध्यावर अद्याप मॉन्सूनने दडीच मारलेली असल्याने कासला पाण्याची स्थिती बिकट आहे. तलावाच्या जॅकवेलजवळ अवघा साडेपाच फूट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तलावात एक फूट पाणीपातळी अधिक खालावली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी तलावात साडेसहा फूट पाणीसाठा होता. 

तलावात साडेचार फुटांच्या खाली मृतसाठा समजला जातो. साडेचार फुटांवर पाणीपातळी आल्यास तलावातील पाणी पंपाने उचलून जॅकवेलमध्ये टाकावे लागते. २००२ मध्ये ही परिस्थिती निर्माण झाली होती. त्याची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी पालिका प्रशासनाने देव पाण्यात ठेवले आहेत. कोणत्याही कारणाने पाण्याची नासाडी टाळून पाऊस सुरू होईपर्यंत सातारकरांना पाणी पुरवावे लागणार आहे. नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून टंचाईच्या काळात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

काटकसरीने पाणी वापरावे
तलावातून साताऱ्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे रोज एक इंचाने तलावातील पाणीपातळी उतरते. उपलब्ध पाणी आठ ते दहा दिवस पुरेल. तोपर्यंत पाऊस सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. अन्यथा तलावातील राखीव साठा इंजिन लावून उपसावा लागणार आहे. पालिकेकडे दहा व साडेसात अश्‍वशक्तीचे दोन पंप कास येथे आहेत. गरज पडल्यास त्याचा उपयोग केला जाईल. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पालिकेचे पाणीपुरवठा सभापती सुहास राजेशिर्के यांनी केले आहे.

Web Title: satara news kas lake water decrease