कास पठारावर झाला हक्काचा निवारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

कास - कास पठाराचा जागतिक वारसास्थळात समावेश होऊन पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला. लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देऊ लागले. या पर्यटकांच्या सुरक्षितता व सोयी-सुविधांसाठी वन विभाग व वन व्यवस्थापन समितीचे कर्मचारी निसर्गाशी सामना करत उभे असतात. या कर्मचाऱ्यांसाठी पठारावरच सुसज्ज निवारा शेड उभे राहिल्याने सर्वांचीच सोय झाली आहे. 

कास पठारावर जुलै, ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, दाट धुके व अंग गारठवणारी थंडीमुळे सलग दोन-चार तास थांबणेही मुश्‍कील असते. ऑगस्टमध्ये फुले यायला सुरवात होते. त्यामुळे पर्यटकही गर्दी करू लागतात; पण अचानक कोसळणारा पाऊस, धुके व थंडगार हवा अशा वातावरणात कर्मचारी व वृद्ध पर्यटक, लहान मुलांना त्रास होतो. कास पठारावर सुरक्षा व पठाराच्या देखभालीसाठी वर्षभर कर्मचारी तैनात असतात. पूर्वी कास पठारावर राजमार्गाचा फाटा असलेल्या ठिकाणी निवाऱ्यासाठी गवत व कागदाची झोपडी उभारण्यात आली होती; पण झोपडीऐवजी मजबूत व सुसज्ज अशा शेडची गरज होती. कर्मचाऱ्यांसाठी नाही तर येणाऱ्या लहान मुले, वृद्ध पर्यटकांनाही गरजेनुसार अशा निवाऱ्याची गरज होती. हा निवारा तयार झाल्याने अनेकांची सोय झाली आहे. या प्रकारचे अजून दोन निवारा शेड अन्य दोन ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.

चालू हंगामाच्या यशस्वितेसाठी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, वन क्षेत्रपाल सचिन डोंबाळे, बामणोलीचे वनपाल श्रीरंग शिंदे, वनरक्षक संतोष शिंदे, कार्यकारी समितीच्या अध्यक्ष विमल शिंगरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आखाडे आंदीसह सहा गावांतील कार्यकारी समितीच्या सदस्यांसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

पर्यटकांना मिळणार चांगल्या सुविधा
कास पठाराचे व्यवस्थापन पाहण्यासाठी नवीन कार्यकारी समिती अस्तित्वात आली आहे. या समितीने कारभार हाती घेतल्यानंतर अनेक धडाकेबाज निर्णय घेऊन अंमलबजावणीही सुरू केली आहे. समितीने पर्यटकांच्या सोयीसाठी नुकतेच नवीन गाइड तयार करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर घेतले. इतर बाबींवरही काम चालू असल्याने कासवर या वर्षी पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळतील, असे चित्र आहे.

Web Title: satara news Kass Pathar