उन्हाचा तडाखा? ...बी कूल यार!

उन्हाचा तडाखा? ...बी कूल यार!

उन्हाळा म्हणजे अंगाची लाही लाही... अंतर्बाह्य काळजी घेण्याचा काळ. उन्हाचा तडाखा बसणार नाही याची जशी काळजी घ्यावी लागते, तसेच शरीर आतून कोरडे पडणार नाही, याचीही. उन्हाळा सुट्यांचा कालावधी असला तरी हाच उन्हाळा भाजून काढतो. वाढती उष्णता आरोग्यावर परिणाम करते. काळजी घेतली नाही तर उष्माघाताचा धोकाही संभवतो. संतुलित आहार, द्रवपदार्थांचे नियमित सेवन आणि उन्हापासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य कपड्यांचा व अन्य माध्यमांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे असते. या उन्हाळ्यात स्वतःला ‘कूल’ कसे ठेवावे, याची खबरदारी घ्यायला हवी. 

उष्माघात... ठरेल धोका
नकोशा वाटणाऱ्या उन्हाळ्यात रखरखीत उन्हाची काहिली अंगावर येते. एप्रिल महिना सुरू झाला आणि उन्हाचे चटके जाणवू लागले. जिल्ह्याचे तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. यंदाचा उन्हाळा सरासरीपेक्षा जास्त तापणार असल्याने तो अनारोग्यास कारणीभूत ठरण्याची तीव्र शक्‍यता आहे. उन्हाळ्यात अल्पश्रमानेही थकवा जाणवतो. या काळात शरीरातून घामावाटे जीवनावश्‍यक सोडियम पोटॅशियम, पाणी बाहेर टाकले जाते. यामुळे क्षयरोग, गोवर, कांजण्या, नागीणसारखे विकार होण्याचा धोका आहे. विशेषत: शरीरातील पाणी कमी झाल्याने उष्माघाताचाही धोका संभवतो. अतिसार, लघवीला जळजळ होणे, उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास संभवतात. सतत घाम येण्यामुळे शरीराला दुर्गंधी तसेच विविध त्वचारोग होण्याची शक्‍यता असते. अंगावर घामोळ्या तसेच पुरळ येतात. उन्हात जास्त वेळ काम केल्याने शरीरात उष्णता वाढते. जिल्ह्यात उष्माघाताचे प्रमाण कमी आहे. मात्र, तशी लक्षणे आढळल्यास रुग्णांनी डॉक्‍टरांचा वेळीच सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी केले. 

कूल.....लुक 
समर सिझन असला तरी तरुणाईला ‘हटके’ फॅशन हवीच. ही तरुणाई या सिझनमध्ये नवनव्या फॅशनचा फंडा आजमावत आहे. ‘कूल लुक’ आणि हटके स्टाइलच्या जोडीला उन्हाळ्यात कन्फर्टेबल असावे, असेच कपडे परिधान करण्यावर तरुण-तरुणींचा भर आहे. यंदाही कॉटनमध्ये फिक्‍या रंगाचे आणि प्रिंटेड कपड्यांचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुटसुटीत कपड्यांच्या फॅशनचा बोलबाला आहे. लाइट कलर प्लस बोल्ड प्रिंटचे झक्कास कॉम्बिनेशन तरुणाईला आकर्षित करीत आहे. 

क्‍लासिक आणि वेगळा लुक देणाऱ्या फॅशनची चलती आहे. टी-शर्टपासून र्थी-फोर्थपर्यंत... पल्लाझोपासून ते स्कार्फपर्यंत प्रत्येक कपड्यात एक वेगळी स्टाइल जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुती कपडे तसेच कॉटन आणि होजिअरीचे कपडे वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याशिवाय लिनन आणि जॉर्जेटच्या कपड्यांचीही फॅशन आहे. पातळ कॉटनचे रंगीबेरंगी कपडेही आकर्षित करीत असून, उन्हाळ्यात फिक्कट रंगांना पसंती मिळत आहे. प्लेन कापड आणि त्यावर फिकट रंगाचं प्रिंटवर्क असाही ट्रेंड आहे. पांढऱ्या रंगातील कपड्यांचे विविध प्रकारही बाजारात दिसून येतील. यंदा पिवळ्या रंगासोबतच फिक्कट जांभळा, निळा, गुलाबी अशा रंगांचे कपडे खरेदी केले जात आहेत. 

स्लिव्हलेस शॉर्ट कुर्त्याबरोबरच गुडघ्यापर्यंतच्या स्कर्टसह कॉटन-होजिअरीमधील पांढऱ्या रंगाच्या ट्राउझर्सचा कॅज्युअल लुक लोकप्रिय ठरत आहे. फॉर्मल कपड्यांमध्ये फॉर्मल शर्ट, स्ट्रेट स्कर्टलाही सध्या चांगली मागणी आहे. विशेष म्हणजे पॅंट आणि स्कर्ट फिकट रंगाचे, तर शर्ट आणि टॉप प्रिंटेड असण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. थ्री-फोर्थमध्ये कॉटन, शिफॉन, लेस फॅब्रिक अशा अनेक प्रकारच्या कपड्यांचा वापर केला जात आहे. महिला, युवती क्रॉप पॅन्ट्‌स, कफ्तान, पलाझ्झो, कॉटन जम्पसुट्‌स, लाँग शर्ट आणि वनपीस ड्रेसेस वापरत आहेत. ज्यूट, टेराकोटापासून बनविलेले इअरिंग्ज, पेंडट्‌स यांच्यासह शूजपेक्षा चप्पल्स आणि सॅंडल्स वापरण्यावर तरुणींचा भर आहे. कॉटन स्कार्फलाही पसंती मिळत आहे. समर सीझनमध्ये सनग्लासेस अधिक भाव खाऊन जातात. मोठ्या आकाराची हॅट आणि टोप्याही तरुणाई वापरत आहे. 

वाळा आरोग्यदायी
उन्हाळ्यातील उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणारी एक वनस्पती म्हणजे ‘वाळा’. सुकलेल्या गवताप्रमाणे दिसणारा वाळा थंड स्वरूपाचा असून, उन्हाळ्यात मंदावलेल्या पचनशक्तीला चालना देण्यास मदत करतो. उन्हाळ्यात फ्रीजचे पाणी पिणे हे आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे अनेक जण माठातील पाणी पिण्यास प्राधान्य देतात. माठात किंवा इतर भांड्यातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड करण्यासाठी त्यामध्ये वाळ्याची जुडी घालून ठेवल्यास फायदा होतो. वाळा पाण्यात सडत नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून दर १५ दिवसांनी वाळा पाण्यातून काढून उन्हात वाळवून पुन्हा वापरू शकता. अशा प्रकारे एक वाळ्याची जुडी सुमारे महिना, दीड महिना वापरणे सुरक्षित आहे. तीव्र सूर्यकिरणांचा त्रास झाल्यास उष्माघाताचा त्रास होतो. अशा वेळेस उन्हात कामानिमित्त बाहेर पडणार असाल तर वाळ्याच्या टोप्या घालून बाहेर पडणं अधिक सुरक्षित ठरेल. वाळ्याचे पडदे, पंखे नैसर्गिक स्वरूपातील एअर कंडिशनप्रमाणे काम करतात. वाळ्याच्या टोपीप्रमाणे चप्पल, जॅकेट, साड्याही उपलब्ध आहेत, अशी माहिती येथील व्यावसायिक सारंग माजगावकर यांनी दिली.

डोळे जपाच हं...
उन्हाच्या चटक्‍यांचा परिणाम डोळ्यांवर थेट होत असतो. यामुळे डोळे दुखणे, डोळ्यात काहीतरी टोचल्यासारखे जाणवणे, डोळे चुरचुरणे, लाल होणे, डोळ्यांची आग, जळजळ होणे, दिवसभर उन्हात वावरल्यावर डोळ्यांवर ताण येणे, रांजणवाडी होणे, डोळे येणे ही लक्षणे दिसून येतात. हे टाळण्यासाठी दिवसातून एक-दोन वेळा तरी काम थांबवून डोळे मिटून पाच मिनिटे शांत बसा. यामुळे डोळ्यांवरचा ताण दूर व्हायला मदत होईल. डोळे चुरचुरणे आणि लाल होण्याचा त्रास असेल तर अशा प्रकारे डोळ्यांना विश्रांती देणे फायदेशीर ठरते. थंड पाण्यात भिजवलेल्या कापडाची पट्टी डोळ्यांवर ठेवूनही बरे वाटते. दिवसभर दर दीड-दोन तासांनी डोळे व चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने ड्रॉप्स वापरावे. तसेच उन्हात फिरतात ‘यूव्ही’ प्रोटेक्‍टर सन गॉगल्स आवश्‍यक वापरावेत, असा सल्ला डॉ. अर्जुन सिद्धरेड्डी यांनी दिला. 

सुखावणारे सुती कपडे
उन्हाळा म्हटला, की गर्मीमुळे घाम, दुर्गंधी आणि खाज सुटणे, अशा अनेक समस्या उद्‌भवतात. यापासून बचावासाठी प्रामुख्याने सुती कपडे बाजारपेठेत उपलब्ध आहेत. एप्रिल, मेमध्ये उन्हाचा कहर होत असल्याने त्याला खादी कापडे हा उत्तम पर्याय असतो. सुती, लिनन कपडांच्या साड्याही बाजारपेठेत उपलब्ध आहेत. सिंथेटिक कपड्यांचा वापर टाळावा. लाल, काळे आदी गडद रंग सूर्यकिरणांना शोषून घेतात व शरीरात उष्णता निर्माण करतात. त्यामुळे गडद रंग टाळावेत. हलके रंग डोळ्यांना शांतता देतात म्हणून गुलाबी, आकाशी, पांढरा, पिवळा आदी रंगांचे कपडे वापरावेत. उष्णता व घामामुळे स्कीन ॲलर्जी होण्याचा धोका असल्याने घट्ट फिटिंगच्या कपड्यांचा वापर टाळावा. थोडे सैल फिटिंगचे कपडे आरामदायक असतात. लांब बाह्यांचे कपडे घालावे. त्यामुळे हात उन्हाच्या संपर्कात येत नाहीत, अशी माहिती सिटी सेंटरचे मोहित कटारिया यांनी दिली.

सौंदर्य जपा
केसांनी स्त्रियांचे सौंदर्य खुलते यात शंका नाही. मात्र, उन्हाळ्यातील रस्त्यावरच्या धुळीमुळे केस आणि चेहऱ्याची दशाच बिघडते. ऑईली स्कीन अन्‌ केसांची झालेली दुर्दशा तुमच्या सौंदर्याचे गणितच बिघडून टाकते. या गाळात केसांची गळती, कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे जेव्हा उन्हाशी थेट संपर्क येणार असतो, तेव्हा त्यांचे संरक्षण स्कार्फ, कॅप किंवा हॅट वापरून करावे. मात्र, हे करताना इन्फेक्‍शन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. स्कार्फ, कॅप वापरल्यानंतर पुन्हा केस कोरडे करावेत. ‘झेडपीटीओ’ शॉम्पू वापरावा. पंधरा दिवसांतून एकदा केसांचे मसाज, हेअर स्पा करावे. चेहऱ्याचे सौंदर्य जपण्यासाठी ‘एसपीएफ’ सनस्क्रिन वापरावी. त्वचा कोरडी परत असल्यास मॉइश्‍चराइज्ड क्रीम वापरा. दिवसातून तीन वेळा थंड पाण्याने चेहरा धुवा. संतुलित आहार घ्यावा, असे इंम्प्रेशन ब्युटी पार्लरच्या संचालिका स्वाती ओक यांनी सांगितले. 

ज्येष्ठांनी घ्यावी काळजी
‘नको रे बाबा, हा उकाडा,’ आता ही प्रतिक्रिया सहज ऐकू येऊ लागली आहे. विशेषत: ज्येष्ठांना हा उन्हाळा नको नकोसा झाला आहे. दुपारची उष्णता शरीरावर परिणाम करत असते. वृध्दापकाळाने भूक मंदावली असतानाच उन्हाळ्यामध्ये ती अधिक मंदावते. त्यामुळे उत्साह कमी होऊन थकवा वाढतो. वातावरणाला सामोरे जाण्यासाठी संतुलित आहार घ्यावा. उन्हाळ्यात शक्‍यतो सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये घराबाहेर पडणे टाळावे. अगदीच आवश्‍यकता असल्यास घराबाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली, छत्री ठेवावी. तीव्र किरणांपासून संरक्षण करण्यासाठी डोळ्यांवर चांगला चष्मा किंवा गॉगल वापरावा. 

उष्माघाताची लक्षणे... 
ताप येणे 
डोके दुखणे 
डोळ्यांची जळजळ 
त्वचा कोरडी पडणे
रक्‍तदाब वाढणे
खूप तहान लागणे

उष्माघात टाळण्यासाठी... 
ताप असल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घ्या
डोक्‍याला रूमाल बांधून, टोपी घालून बाहेर पडा
उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नका

...हे करा
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुरेसे पाणी प्या 
बाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवा
शरीर थंड ठेवण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ
ताजे अन्न, ताजी फळे व भाज्या मुबलक खा

‘सनस्क्रीन लोशन’ वापरा
जाड टोपी घाला आणि गॉगलचा वापर करा हलके, हवेशीर व फिक्‍या रंगांचे कपडे घाला पचावयास हलका आणि पातळ आहार घ्या उसाचा रस, भाताची पेज, सूप्स, मनुका घ्या उन्हातून आल्यावर थोड्या वेळाने प्यावे वाळा, चंदन, मोगरा टाकून पाणी प्या सुगंधी फुल, सुवासिक गोष्टी जवळ ठेवा 
- वैद्य सुयोग दांडेकर, सातारा


...हे करू नका
उघड्यावर कापून ठेवलेली फळे टाळा
बर्फ दूषित असल्याने रसात बर्फ टाळा
उन्हाळ्यात सिंथेटिक कपडे टाळा
बारा ते तीन वेळेत उन्हात जाणे टाळा
मद्यपान, अल्कोहोल पेय सेवन नको

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com