‘काळा कडा’ बनलाय मृत्यूचा सापळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

मेढा - पश्‍चिम जावळीतील केळघर घाट धोकादायक झाला आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे घाटात कधीही गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते. तातडीने ठोस उपाययोजनांची करण्याची आवश्‍यकता आहे.

मेढा - पश्‍चिम जावळीतील केळघर घाट धोकादायक झाला आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे घाटात कधीही गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते. तातडीने ठोस उपाययोजनांची करण्याची आवश्‍यकता आहे.

मेढामार्गे महाबळेश्वरला जाण्यासाठी नेहमी जाणारे चाकरमानी, कोकणवाशी तसेच कामगार व मोलमजूरी करणारे शेकडो हात याच केळघर घाटाला अधिक पसंती देतात. मात्र, याच केळघर घाटात पावसापूर्वी आज एवढी धोकादायक परिस्थिती झाली आहे की प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला जीव मुठीत घेवून जात असल्याचा प्रत्यय येईल. नेहमी जा- ये करणारांना धोका कोठे आहे, कोठे थांबू नये, कोठून प्रवास तातडीने करावा, असे बारकावे माहीत असल्याने ते सुसाट निघून जातात. मात्र, पर्यटन आणि मौजमजा करण्यासाठी येणारी मंडळी मात्र घाट रस्त्यात झाडाखाली दरडीलगत गाड्या लावून निसर्गाचा आनंद घेतात. 

मात्र, कधी काय घडेल? याचा नेम नाही. तेव्हा या पर्यटकांची काळजी व दक्षता घेणे हे काम कोणाचे? जिथे धोकादायक ठिकाणे आहेत तिथे सूचना फलक कोणी लावायचे ? जे फलक जुने जीर्ण आहेत, ते ठळक करून चालकांचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.

तब्बल १८ किलोमीटरच्या घाटात अति तीव्र धोकादायक ठिकाणे १८ पेक्षा अधिक आहेत. रस्ता काही ठिकाणी कडेला खचलेला आहे. अनेक ठिकाणी संरक्षण कठडे अपघातात तुटलेले आहेत. त्यामुळेही अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्ते अरुंद व साइडपट्टी खराब अशी विचित्र अवस्था आहे. त्यामुळे वाहन चालविताना मोठी कसरत  होत आहे. 

घाटात काळा कडा या नावाने प्रसिध्द असलेले अपघात ठिकाण आता मृत्यूचा सापळाच झालेले आहे. या ठिकाणी मोठा दगड रस्त्यातच पडलेला आहे. या दगडामुळे या ठिकाणी एकेरी वाहतूक होते. विशेष म्हणजे प्रशासनाला सहा महिने झाले हा दगडच हालविता आला नाही. या परिसरात तर कधी दरडी व दगडे कोसळतील हे सांगणे अशक्‍य आहे. ही काळजी प्रशासनाने या पूर्वीच घेतली पाहिजे होती. मात्र, त्याकडेही अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. एखादी घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. 

केळघर घाटातील कामे तातडीने होणे आवश्‍यक आहे. प्रवासी संख्या मोठी आहे. दुर्घटना घडण्यापूर्वीच काळजी घेतली तर सर्वांसाठीच सुरक्षितता ठरेल.
-संतोष कदम, रा. वरोशी, प्रवासी

Web Title: satara news kelghar ghat