रस्ता नसताना दोन पुलांची नव्याने बांधणी! 

रस्ता नसताना दोन पुलांची नव्याने बांधणी! 

कोरेगाव - रस्त्याचा पत्ता नसताना येथे जुन्या रेल्वे ट्रॅकवरील दोन ब्रिटिशकालीन पुलांना समांतर दोन नवीन पुलांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. नाबार्ड योजनेंतर्गत या पुलांसाठी एक कोटी 90 लाख रुपये मंजूर असून, हे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. रस्ता नसताना होऊ घातलेल्या या पुलांचा उपयोग जनतेला किती होणार, अशी चर्चा त्या परिसरात सुरू झाली आहे. 

सातारा- पंढरपूर रस्त्यापासून येथून लक्ष्मीनगर (आझाद चौक) ते आरफळ कॉलनी असा सुमारे दोन किलोमीटर अंतराचा जुना रेल्वे ट्रॅक आहे. रेल्वे शहराबाहेरून गेल्यापासून या ट्रॅकला रस्त्याचे स्वरूप आले आहे. मात्र, रस्त्यावर अगदी अडीच ते तीन फुटांपर्यंत मोठमोठे खड्डे आहेत. वाहने सोडा; पादचाऱ्यांना चालणेही मुश्‍कील झालेले आहे. हा रस्ता नेमका कोणाचा या वादात या रस्त्यावर आजवर कधीही डांबरीकरण, खडीकरण झाल्याचे दिसले नाही. मात्र, ग्रामपंचायतीच्या वतीने कधी तरी खडी, मुरूम टाकून डागडुजी करण्याचा प्रयत्न होतो. या ट्रॅकच्या कडेला कळकाई नावाची वसाहत आहे. ट्रॅकच्या अगदी कडेला दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात बांधकामे झालेली असून, ती अतिक्रमित की वैयक्तिक मालकीच्या जागेत आहेत, हाही संशोधनाचा विषय आहे. या दोन किलोमीटर अंतरात श्री केदारेश्‍वर मंदिराजवळ तीळगंगा नदीवर सुमारे 50 मीटर अंतराच्या फरकाने दोन ब्रिटिशकालीन दगडी पूल मजबूत असून, त्यांचा उपयोग धड रस्ता नसल्याने फारस होताना दिसत नाही. या दोन्ही पुलांना समांतर पूल उभारण्यासाठी "नाबार्ड'मधून प्रशासकीय 90 लाख मंजूर झाले असून, प्रत्यक्ष निविदा एक कोटी 90 लाख रुपये मंजूर होऊन 15 दिवसांपूर्वी प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. दोन्ही पुलांची रूंदी समान म्हणजे 15 फूट असेल आणि एका पुलाची लांबी 60 मीटर, तर दुसऱ्याची 30 मीटर असेल. नवीन पूल हे शहराच्या बाजूने तयार करण्यात येत असून, जुन्या आणि नवीन पुलांमध्ये पाच ते सहा फुटांचे अंतर असेल. 

पुलांचे डिझाईन हे सध्या असलेल्या ब्रिटिशकालीन पुलांना "मॅच' होईल, असे म्हणजे कमानी पुलासारखे असेल. या डिझाईनमध्ये भारतात यापूर्वी नागपूर महापालिकेने पूल उभारला असून, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रथमच हे डिझाईन वापरात आणणार आहे. यानंतर आवश्‍यकतेनुसार असे पूल अन्यत्र होतील. मात्र, पहिले पूल कोरेगावात उभे राहणार आहेत. मात्र, रस्त्याचा पत्ता नसताना युद्धपातळीवर सुरू झालेल्या या कामाने नागरिकांत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दुसऱ्या बाजूने पुलांची कामे ज्या गतीने सुरू होत आहेत, त्याच गतीने रस्त्याचे काम मंजूर करून ते सुरू करावे, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. 

""या पुलांच्या दोन्हीही बाजूला सध्या रहदारीयोग्य रस्ता नाही. मात्र, "नाबार्ड' मधून मंजूर होऊन या पुलांचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आल्यामुळे आम्ही करत आहोत. दोन्ही बाजूच्या रस्त्यांचा प्रस्ताव अर्थसंकल्पात दिलेला आहे. मात्र, अद्याप मंजूर नाही.'' 
- आर. टी. अहिरे,  उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कोरेगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com