कोयना धरण व्यवस्थापन यंदा ‘टेन्शन फ्री’

जालिंदर सत्रे 
बुधवार, 13 डिसेंबर 2017

पाटण - जुलैपासून सातत्याने झालेला पाऊस आणि सिंचनासाठी झालेला कमी वापर यामुळे कोयना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेबारा टीएमसी जादा पाणी शिल्लक आहे. धरण डिसेंबर महिन्यातही काठोकाठ भरलेले पाहावयास मिळत आहे. कोयना जलाशयात सध्या एकूण ९६.७५ टीएमसी पाणी आहे. सिंचन आणि वीज निर्मितीसाठी पाणी नियोजनाचा ताण यावर्षी धरण व्यवस्थापनावर येणार नाही. त्यामुळे धरण व्यवस्थापन यावर्षी ‘टेंन्शन फ्री’ असणार आहे.

पाटण - जुलैपासून सातत्याने झालेला पाऊस आणि सिंचनासाठी झालेला कमी वापर यामुळे कोयना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेबारा टीएमसी जादा पाणी शिल्लक आहे. धरण डिसेंबर महिन्यातही काठोकाठ भरलेले पाहावयास मिळत आहे. कोयना जलाशयात सध्या एकूण ९६.७५ टीएमसी पाणी आहे. सिंचन आणि वीज निर्मितीसाठी पाणी नियोजनाचा ताण यावर्षी धरण व्यवस्थापनावर येणार नाही. त्यामुळे धरण व्यवस्थापन यावर्षी ‘टेंन्शन फ्री’ असणार आहे.

१०५ टीएमसी क्षमता असणाऱ्या शिवसागर जलाशयात शिल्लक असणारा ९६.७५ टीएमसी पाणीसाठा शेतकरी व धरण व्यवस्थापनाला मोठा दिलासा देणारा ठरणारा आहे. गेल्या वर्षी ८४.३२ टीएमसी पाणीसाठा होता. यावर्षी जादा साडेबारा टीएमसी बोनस असणार आहे. गेल्या वर्षी ११ डिसेंबरअखेर पश्‍चिमेकडे वीज निर्मितीसाठी ३१.१३ टीएमसी पाणीवापर झाला होता. मात्र, यावर्षी २४.८४ टीएमसी झालेला वापर तुलनेत ६.२९ टीएमसीने कमी आहे. सिंचनासाठी २.३३ टीएमसी पाण्याचा कमी वापर झाला असून, गेल्या वर्षी ७.६२ टीएमसी व यावर्षी ५.२९ टीएमसी झाला आहे. १२२.१४ टीएमसी पाण्याची आवक यावर्षी झाली असून, अतिवृष्टीकाळात सहा वक्र दरवाजांतून ७.०६ टीएमसी पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडून देण्यात आले होते. पायथा वीजगृहातून २.४८ टीएमसी पाणीवापर झालेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सातत्याने झालेल्या पावसामुळे तो कमी झालेला आहे. यापुढे सातत्याने पाणी सोडले तरी काहीही अडचण येणार नाही, अशी स्थिती आहे. 

पश्‍चिमेकडील अलोरे वीज केंद्रातून २५६.६२८ दश लक्ष घनफूट युनिट, पोफळी केंद्रातून ५३२.३०० दश लक्ष घनफूट युनिट, चौथ्या टप्प्यातून ३७७.६९७ दश लक्ष घनफूट युनिट व पायथा वीज गृहातून ३४.७५९ दश लक्ष घनफूट युनिट अशी एकूण १२०१.३८४ दश लक्ष घनफूट युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे.

जून महिन्यात गेली तीन वर्षे काटेकोर नियोजनाची धरण व्यवस्थापनाला कसरत करावी लागत होती. कर्नाटकला दुष्काळामुळे द्यावे लागणारे पाणी, महाराष्ट्रात वीज व सिंचनासाठी वाढत चाललेली मागणी याचा सर्व परिणाम धरण व्यवस्थापनावर यायचा मात्र यावर्षी धरण पाणीसाठ्याच्या बाबतीत मजबुत स्थितीत असल्याने धरण व्यवस्थापन ‘टेंन्शन फ्री’ राहणार आहे.

धरण व्यवस्थापन आता कुमार पाटलांकडे
गेली दोन वर्षे नियोजनाबरोबर सर्वांशी सलोखा राखून धरण व्यवस्थापनाचा कारभार कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर बागडे यांनी केला. कोणतेही गालबोट अथवा सातत्याने घडणारे वादंगाचे प्रसंग शांत स्वभावाच्या श्री. बागडे यांनी घडू दिले नाहीत. मात्र, आता त्यांची बदली झाली असून, धरण व्यवस्थापनाचा कारभार आता कुमार पाटील पाहणार आहेत.

Web Title: satara news koyna dam patan