‘कृष्णा’ला वाढतोय जलपर्णीचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

भुईंज - परिसरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये वाईहून वाहत येणाऱ्या जलपर्णीचा पुन्हा विळखा पडत आहे. ज्या-ज्या ठिकाणी ही जलपर्णी स्थिर होत आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिची वाढ होऊन सर्वच पात्र माखले जात आहे. आता ही जलपर्णी हटविण्यासाठी स्थानिकांनी मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.

भुईंज - परिसरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये वाईहून वाहत येणाऱ्या जलपर्णीचा पुन्हा विळखा पडत आहे. ज्या-ज्या ठिकाणी ही जलपर्णी स्थिर होत आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिची वाढ होऊन सर्वच पात्र माखले जात आहे. आता ही जलपर्णी हटविण्यासाठी स्थानिकांनी मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.

देशातील मिनी काश्‍मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये उगम पावलेल्या कृष्णा नदीचा काठावर असणाऱ्या सर्व गावांवर मोठा वरदहस्त आहे. नदीकाठावर असणाऱ्या या नैसर्गिक सौंदर्यामुळे अवघी चित्रपटसृष्टी या परिसरात धावत असून, हिंदी आणि मराठी चित्रपटांनी या परिसराचे वैभव देशभरात पोचविले आहे. एवढे सगळे भरभरून देणाऱ्या कृष्णा नदीचा गेल्या दोन वर्षीपूर्वी जलपर्णीने जीव गुदमरून टाकला होता; परंतु अनेक सेवाभावी संस्था व जागृत ग्रामस्थांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जोपासत जलपर्णीच्या व नदीकाठच्या घाणीतून नदीला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न प्रयत्न केला. अनेक संशोधकांनी याबाबत गावोगावी जाऊन नदीकाठच्या पात्रांचे व प्रवाहाचे सर्वेक्षणही केले;  परंतु जिल्हा प्रशासन किंवा संबंधित यंत्रणेने नदीकाठच्या गावातील ग्रामपंचायत अथवा ग्रामस्थांना विश्वासात न घेता नेमका कसा सर्व्हे केला किंवा कोणती उपाययोजना राबविली जाणार हे आजही जनतेसमोर आले नाही. गेल्या वर्षी पावसाळा मोठ्या प्रमाणात झाला असला, तरी नदीला हव्या तेवढ्या प्रमाणात पूर आले नसल्याने ही जलपर्णी वाहून गेली नाही. ती तशीच राहून त्यात आता पुन्हा नव्याने भर पडत आहे. सध्या कृष्णा नदी पात्रात ज्या- ज्या ठिकाणी पाणी वाहत नाही, अशा ठिकाणी जलपर्णी रौद्रस्वरूप धारण करीत आहे. 

आता तिचे प्रमाण अल्प असल्याने ती हठविणे गरजेचे आहे. ही मोहीम शासकीय आदेशाने गावपातळीवर राबविल्यास या जलपर्णीचे पसरणारे जाळे आताच आटोक्‍यामध्ये आणता येईल अन्यथा जलपर्णीने रौद्रस्वरूप धारण केल्यास पाण्यातील जलचरांना मिळणारा ऑक्‍सिजन कमी होऊन ते मृत पावून पाणी दूषित होईल. नदीचे पाणी दूषित झाल्यास  रोगराईला आमंत्रण मिळणार असून, शासनाने ही बाब गांभीर्याने घेतल्यास त्याच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागणार नाही.

केंद्र सरकारची मदत मिळविण्याची गरज 
जिल्ह्यातील संथ वाहणाऱ्या कृष्णामाईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीचा हात मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेत कृष्णा नदीचा समावेश करण्यात आला असून, सध्या कऱ्हाड व सांगली या मोठ्या शहरांमधून जलशुद्धीकरणाचा कार्यक्रम रावबिला गेला आहे. मात्र, उगम स्थानापासून ते कऱ्हाडच्या प्रीतिसंगमापर्यंतच्या गावांचा विचार यामध्ये करण्यात आलेला दिसून येत नाही.

Web Title: satara news krishna river waterleaf