कुरणेश्‍वर परिसर पुन्हा वृक्ष, पक्ष्यांनी लागला बहरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

सातारा - उत्साहाच्या भरात केलेल्या चुकीच्या पद्धतीच्या वृक्षारोपणाचे तोटे समोर आल्यानंतर येथील खिंडीतील गणपती व कुरणेश्‍वर देवस्थान ट्रस्टने सुमारे अडीच वर्षांपूर्वी आपली चूक सुधारत नव्याने तीन एकर क्षेत्रात पूर्णत: देशी वनस्पतींची लागवड व संगोपनाचे काम हाती घेतले. लोकसहभागातून सुरू झालेल्या या कामाला यश दिसू लागले असून, सुमारे ३८० देशी प्रजातींच्या वनस्पती डोलताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये १५० मोठे वृक्ष आहेत.

सातारा - उत्साहाच्या भरात केलेल्या चुकीच्या पद्धतीच्या वृक्षारोपणाचे तोटे समोर आल्यानंतर येथील खिंडीतील गणपती व कुरणेश्‍वर देवस्थान ट्रस्टने सुमारे अडीच वर्षांपूर्वी आपली चूक सुधारत नव्याने तीन एकर क्षेत्रात पूर्णत: देशी वनस्पतींची लागवड व संगोपनाचे काम हाती घेतले. लोकसहभागातून सुरू झालेल्या या कामाला यश दिसू लागले असून, सुमारे ३८० देशी प्रजातींच्या वनस्पती डोलताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये १५० मोठे वृक्ष आहेत. २३ ते २५ डिसेंबर दरम्यान कुरणेश्‍वर येथे नक्षत्रवन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी या काळात येऊन विविध वनस्पतींची माहिती घ्यावी, असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. 

येथील बोगद्यापासून जवळ असलेले कुरणेश्‍वर देवस्थान अर्थात खिंडीतील गणपती म्हणजे सातारकरांचे आराध्य दैवत. सुमारे साडेपाच एकर क्षेत्राचा हा शांत व रम्य परिसर आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. त्यात आकेशिया, रेन ट्री, सुबाभूळ, ग्लिरिसिडीया आदी प्रकारच्या परदेशी झाडांची लागवड करण्यात आली होती. मात्र, पुढे या झाडांचे तोटे स्पष्ट होऊ लागले. पानगळीच्या बारीक पानांचा जमिनीवर थर साचतो. एखाद्या ठिकाणी चुकून काडी पडली तरी वणव्याची आग पसरते. परदेशी झाडांवर पक्षी बसत नाहीत, घरटी करत नाहीत. त्यामुळे पक्ष्यांचा वावर थांबला. पक्ष्यांमार्फत होणारी बिजारोपणाची प्रक्रियाही थांबली. परदेशी झाडांमुळे त्यांच्या छत्रछायेखाली इतर रोपांची रुजवण क्षमता थांबली. 

या प्रश्‍नावर मात करण्यासाठी तज्ज्ञांच्या सहभागातून वृक्षसंवर्धन समिती स्थापन झाली. या समितीने जून २०१५ मध्ये कुरणेश्‍वर परिसरात देशी प्रजातीच्या वनस्पतींचे नव्याने रोपण केले. तसेच त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी स्वीकारली. या समितीचे सदस्य डॉ. उमेश करंबेळकर यांनी सांगितले की, ‘‘सुमारे तीन एकर क्षेत्रात नव्याने बेल, रिठा, कवठ, बिब्बा, पिंपरण, अडुळसा, निरगुडी, बकुळ, बिट्टी, गुंज, कडुनिंब, कांचन, आपटा, काटेसावर, पळस, शिंदी आदी देशी झाडांची लागवड करण्यात आली.

जास्वंदी, कण्हेर, शंकासूर, कोरांटी, अनंत, चाफा अशी फुलझाडे तसेच कुरणेश्‍वरच्या संपूर्ण क्षेत्राला तारकुंपणाऐवजी शिकेकाई, सागरगोटा अशा झाडांचा उपयोग करण्यात आला आहे.’’ कुरणेश्‍वर परिसरात आणखी ५० देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. नक्षत्र वनातही २६ प्रजातींचे वृक्ष व वनस्पतींचे संगोपन करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या परिसरात २५ ते ३० प्रकारची फुलपाखरे, ३० ते ३५ प्रकारचे पक्षी आल्याची नोंद झाली आहे. याठिकाणी गोळा होणारा पालापाचोळा, गवत, इतर काडीकचरा यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात आले. त्याचा याच ठिकाणी वापर झाला. गांडूळ खताचा प्रकल्पही येथे कार्यान्वित झाला.

नियोजित कामे...
झाडांपर्यंत सहज जाण्यासाठी पायऱ्या बांधणे
झाडांवर माहितीचे फलक लावणे
लहान शेततळी निर्माण करणे
विहिरीवर पंप बसवून पाइपलाइन करणे
सौरऊर्जेवरील पथदिवे लावणे

Web Title: satara news kurneshwar area tree bird