दरड कोसळण्याच्या छायेतच प्रवास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

केळघर - केळघर घाटात दरडी कोसळून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी होत असल्याने भविष्यात केळघर घाटातून जिवावर उदार होऊनच प्रवास करण्यासारखेच आहे. 

केळघर - केळघर घाटात दरडी कोसळून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी होत असल्याने भविष्यात केळघर घाटातून जिवावर उदार होऊनच प्रवास करण्यासारखेच आहे. 

संततधार पावसाने रविवारी (ता. १६) दुपारी केळघर घाटात काळ्या कड्यानजीक अवघड वळणावर दरड कोसळली. दरडीचे दगड रस्त्यावर आल्याने सुमारे दोन तासांहून अधिक वेळ महाबळेश्वर व साताऱ्याकडे जाणारी वाहतूक पूणर्पणे ठप्प झाली होती. पावसाळ्यात सातत्याने केळघर घाटात दरडी कोसळत असल्याने सुरक्षित असणारा केळघर घाट वाहतुकीसाठी धोकादायक ठरू पाहत आहे. गेल्या वषीर्ही केळघर घाटात पावसाळ्यात दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. एकीकडे महाबळेश्वर-केळघर-मेढा-सातारा-रहिमतपूर-विटा महामार्गाला मंजुरी मिळालेली असताना केळघर घाटात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत असल्याने केळघर घाटातील प्रवास हा रामभरोसेच झाला आहे. वास्तविक धोकादायक वळणांवर सूचना फलक लावणे आवश्‍यक असतानादेखील बांधकाम विभाग तात्पुरती मलमपट्टी करताना दिसून येत आहे.

आणखी दरड कोसळण्याचा धोका
दरड कोसळलेल्या ठिकाणाच्या वरच्या बाजूस गेल्या वर्षी रेंगडी रस्त्याला लागून सुमारे ५० ते ६० फूट भेग पडलेली होती. याबाबतची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने पाहणी करूनसुद्धा बांधकाम विभागाने योग्य ती कायर्वाही न केल्याने याच भागात पाणी जास्त प्रमाणात मुरले आणि दरड कोसळली. या ठिकाणापासून दहा ते १५ फुटांवर तीन मोठे दगड रस्त्यावर येण्याची शक्‍यता आहे. सावर्जनिक बांधकाम खाते यापूर्वी उन्हाळ्यातच केळघर ते महाबळेश्वर रस्त्याच्या वरील डोंगरावर डोंगरी नाले काढून पाणी एका बाजूला वाहून जाण्यासाठी नियोजन करीत होते. परंतु, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे केळघर घाटात जागोजागी दरडी व दगड कोसळण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. दरड कोसळल्यानंतर चमकोगिरी करण्यातच बांधकाम विभाग धन्यता मानत आहे. मात्र, वाहतूक ठप्प होवू नये याबाबत ठोस पावले उचलण्याबाबत वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारत आहे.

घाटात रस्त्याच्या बाजूला भगदाड
याच घाटात वरोशी- रेंगडीदरम्यान धोकादायक वळणावर रस्त्याच्या खालील बाजूस मोठे भगदाड पडल्याने येथून वाहने चालवताना कसरतीचे झाले आहे. या भगदाडामुळे दोन वाहने समोरासमोर आल्यास मोठा अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी भगदाड पडलेल्या ठिकाणी वडाच्या फांद्या  उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. अशा प्रकारची थातूरमातूर उपाय करण्यापेक्षा भगदाड मुजवून संरक्षक कठडे सुस्थितीत असणे गरजेचे आहे. घाटात काही ठिकाणी संरक्षक कठडे तुटलेले आहेत. काही ठिकाणी रेलिंगही तुटलेले आहे. रात्रीच्या वेळेस संरक्षण कठडे व रेलिंग नसल्यामुळे अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न प्रवासी विचारत आहेत.

केळघर घाटातील प्रवास धोकादायक झाला आहे. घाटात दरडी कोसळत असून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडतात. बांधकाम विभागाने याबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- संतोष कासुर्डे, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, केळघर विभाग

Web Title: satara news landslide kelghar ghat