कायद्याची बूज राखण्याची अपेक्षा

कायद्याची बूज राखण्याची अपेक्षा

उदयनराजेंना अंतरिम जामीन मंजूर झाला आणि साताऱ्यातील तणाव निवळला. उत्सुकता, तणाव आणि जल्लोष असे सारे रंग एकाच दिवसात दिसले. तरीही या घटनेच्या परिणामांचा धुरिणांनी बारकाईने विचार करणे क्रमप्राप्त आहे. समाजकारण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांतील कामाची दिशा कशी असावी, हे ठरविणे अत्यंत निकडीचे बनले आहे. प्रशासनाचे वर्तन समाजाभिमुख आणि कायद्याची बूज राखणारे आहे की नाही, याबाबतचा किंतु मनात आला नाही पाहिजे, अशा व्यवस्था असणे आवश्‍यक आहे. 

खंडणीप्रकरणी उद्योजकाच्या खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा खासदार उदयनराजे भोसले आणि नऊ जणांवर मार्चमध्ये दाखल झाला. तेव्हापासूनच्या प्रक्रियेत एकूण सर्वच पातळ्यांवर झालेला विलंब या प्रकरणाचे गांभीर्य वाढविण्यास मदत करीत होता. जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालय दोन्हीकडे उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांना अटक होणे स्वाभाविक होते. ही अटक करण्यासाठी पोलिस यंत्रणेने केलेल्या दिरंगाईमुळे ताण वाढत चालला होता. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दरवेळी उदयनराजेंना कोणत्याही क्षणी अटक करू, अशी भूमिका मांडली. परंतु, प्रत्यक्षात कृती होत नव्हती. ही कोंडी फोडली उदयनराजेनींच. उदयनराजे तीन महिन्यांच्या कालावधीनंतर २१ जुलै रोजी साताऱ्यात आले. पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानापासून शहरातील विविध भागांत त्यांनी फेरफटका मारला आणि पोलिसांना गुंगारा देऊन ते निघूनही गेले. नंतर मंगळवारी स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाले. अटक प्रक्रिया, न्यायालयीन कामकाज वगैरे बाबी पार पडल्या. दिवसभराच्या तणावानंतर झालेल्या जल्लोषानंतर शांतता झाली. उदयनराजेंचे धक्कातंत्र नवे नाही. त्यांच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी भूमाता रॅली काढून त्यांनी सर्वच पक्षांना स्वतःच्या ताकदीचा धक्का जाणवून दिला होता. त्याचप्रकारे आताही पोलिसांना धक्का देण्याचे तंत्र अवलंबिले. पोलिस ठाण्यात ते हजर होताच त्यांच्या समर्थकांनी शहराच्या विविध भागांत गर्दी सुरू केली. दुचाकीवरून येणारे युवक ‘बंद’चे आवाहन करू लागले. शहर उत्स्फूर्त बंद झाले. या उत्स्फूर्ततेची कारणे वेगवेगळी असतील. काहीजणांनी प्रेमापोटी सहभाग नोंदविला असेल.   दुचाकीवरून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद असेल. आपले नुकसान नको, या भीतीपोटी काहींनी ‘बंद’मध्ये सहभाग घेतला असेल. अचानक झालेल्या ‘बंद’मुळे शाळा, महाविद्यालये सोडून देण्यात आली. रिक्षा, बस नसल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. 

या साऱ्या वाटचालीत पोलिसांच्या भूमिकेचे स्पष्ट निराकरण होत नाही. एकदा कोणत्याही क्षणी अटक होणार म्हणायचे, प्रत्यक्षात अटक करायची नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे, असे म्हणायचे आणि प्रत्यक्षात सर्वसामान्यांपुरता खाकीचा रुबाब दाखवायचा, असेच लोकांना वाटते आहे. एकूणच पोलिस यंत्रणेवर वरिष्ठ पातळीपासून काही दबाव होता का, अशी चर्चा सुरू आहे, त्याला पुष्टी मिळण्यासारखेच पोलिस यंत्रणेचे वर्तन राहिले आहे. मूळ गुन्हा दाखल झाला आहे, त्याच्याबाबतची प्रक्रिया नंतर होईल. त्यातून काय निष्पन्न व्हायेच ते होईल; परंतु कायदा व सुव्यवस्था, जिल्ह्याचा औद्योगिक विकास यातील अडथळ्यांना दूर करण्याबाबत कायमस्वरूपी विचार व्हायला हवा. गुन्हेगारी, दादागिरी यासारख्या प्रकारांना चाप बसवून समाजजीवन सुकर होण्यासाठी दिशा दिली पाहिजे.

उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. जिल्ह्यातील राजकारणावर या धक्कातंत्राचा परिणाम जाणवेल. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक राजकारणातील अंतर्गत विरोधकांना हादरा देण्यासाठी उदयनराजेंच्या गटाला बळ मिळण्याची शक्‍यता आहे. उदयनराजेंच्या समर्थकांमध्ये युवकांची संख्या लक्षणीय आहे. युवकांची ताकद नेहमीच मोठी असते. समाजपरिवर्तनासाठी या ताकदीचा मोठा उपयोग होऊ शकतो. युवाशक्तीचा वापर विधायक दिशेने नेता आला तर जिल्ह्याच्या विकासासाठी व समाजपरिवर्तनासाठी ते उपयुक्त ठरणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com