साताऱ्यातही इन्क्‍युबेटर कमीच!

प्रवीण जाधव
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

एका काच पेटीत दोन-तीन अर्भके; अतिदक्षता विभागाचा प्रश्‍न गंभीर

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील इन्क्‍युबेटरच्या संख्येच्या दुप्पट नवजात बालके उपचारासाठी दाखल होत असल्याने एका वॉर्मरमध्ये (काचपेटीत) दोन-तीन अर्भके ठेवावी लागत आहेत. त्यातच कमी मनुष्यबळामुळे या विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागताना दिसते.

एका काच पेटीत दोन-तीन अर्भके; अतिदक्षता विभागाचा प्रश्‍न गंभीर

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील इन्क्‍युबेटरच्या संख्येच्या दुप्पट नवजात बालके उपचारासाठी दाखल होत असल्याने एका वॉर्मरमध्ये (काचपेटीत) दोन-तीन अर्भके ठेवावी लागत आहेत. त्यातच कमी मनुष्यबळामुळे या विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागताना दिसते.

माता-बाल संगोपनाचा शासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. त्याअंतर्गत गर्भवती माता, तसेच ३० दिवसांपर्यंतच्या मुलांवर मोफत उपचाराची सुविधा आहे. अर्भकांवरील उपचारात मुदतीपूर्व जन्म झालेल्या मुलांवर उपचार अत्यंत अवघड असतो. अशा मुलांना काचेच्या पेटीत ठेवावे लागते. खासगी रुग्णालयामध्ये या उपचारांसाठी दिवसाला हजारो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर असते. जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णलयांपैकी जिल्हा रुग्णालयातच ही सुविधा उपलब्ध आहे. माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी अर्भकांच्या अतिदक्षता विभागाच्या नूतनीकरणासाठी प्रयत्न केले. त्यातून खासगी रुग्णालयापेक्षा चांगल्या प्रतीचा अतिदक्षता विभाग तयार झाला. मात्र, आता या विभागातील काच पेट्यांची संख्या अपुरी पडू लागली आहे.

बालकांना संसर्गाचा धोका
जिल्हा रुग्णालयातील या विभागात सध्या १५ काच पेट्या आहेत. मात्र, दर दिवशी साधरणपणे २५ ते ३० अर्भके या विभागात उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे काच पेट्यांच्या संख्येपेक्षा दुप्पट बालके उपचारासाठी दाखल होत असल्याने एका पेटीत दोन बालकांना ठेवण्याची वेळ येते. प्रत्येक बालकाचा आजार वेगळा असतो. त्यामुळे एकाच पेटीत ठेवल्याने एकाचा दुसऱ्याला संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार करणे जिकिरीचे जात आहे.

त्याबाबत रुग्णालय प्रशासनाने कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत.

अपुरे डॉक्‍टर व कर्मचारीही
अतिदक्षता विभागात क्षमतेपेक्षा जास्त मुले उपचारासाठी दाखल होत असताना पुरेसे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी वर्ग नेमणे अत्यावश्‍यक आहे. मात्र, त्याकडेही रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. क्षमतेनुसार बालरोग तज्ज्ञ व तीन वैद्यकीय अधिकारी या विभागात असणे आवश्‍यक आहे. दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येनुसार ही संख्या दुप्पट करावी लागणार आहे. मात्र, सध्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच दिवस-रात्र मेहनत करून हा विभाग सांभाळावा लागत आहे. बालरोग तज्ज्ञ नेमणुकीबाबत जिल्हा रुग्णालय व्यस्थापनाकडून निर्णय होत नाही. 

रुग्णालय व्यवस्थापन कुचकामी
रुग्णांची संख्या, वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची अपुरी उपलब्धता यामुळे जिल्हा रुग्णालयातील अर्भकांच्या अतिदक्षता विभागाचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. या प्रश्‍नाची दाहकता शासन स्तरावर मांडण्यात जिल्हा रुग्णालय व्यवस्थापन अपुरे पडताना दिसते. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारीही या प्रश्‍नावर तोडगा काढण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला हरताळ फासला जात आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना हजारो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

मृत्यू दर कमी राखण्यात यश
काच पेट्यांची अपुरी संख्या, वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांचा अभाव या सर्व परिस्थितीतही जिल्हा रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागात डॉ. अरुधंती कदम व डॉ. उल्का झेंड या परिश्रम घेतात. बाह्य रुग्ण विभाग, लहान मुलांचा वॉर्ड व इतर कामे सांभाळून अर्भकाच्या उपचारासाठी त्या उपलब्ध राहतात. त्यामुळे या विभागातील मुलांचा मृत्यूदर कमी राखण्यात त्यांना यश आले आहे. एप्रिल २०१६ पासून या विभागात एक हजार ६९३ लहान मुले दाखल झाली. त्यातील एक हजार ५५३ मुलांना बरे करून घरी सोडण्यात आले. दीड वर्षात १४० मुले मृत्युमुखी पडली. या विभागातील सर्वसाधारण मृत्यू दर दहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावा लागतो. या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यात तो आठ टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे.

काय आहे इन्क्‍युबेटर?
अकाली प्रसूती झालेल्या अर्भकात फॅटचे प्रमाण अगदीच कमी असते. त्यामुळे त्याच्या शरीरातील तापमान आवश्‍यक तितके राहात नाही. हे तापमान इन्क्‍युबेटरमध्ये मिळते. तापमान किती ठेवायचे याचा निर्णय डॉक्‍टर बाळाचे वजन व कितव्या महिन्यात जन्म झाला ते पाहून ठरवतात. मूल सातव्या महिन्यात जन्मले असल्यास तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत ठेवले जाते. मूल काहीच आठवडे आधी जन्मले असेल तर तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत ठेवले जाते. इन्क्‍युबेटरमध्ये थर्मोस्टॅट यंत्रणा असते. त्यामुळे एकच तापमान कायम ठेवता येते. बाळाला हवी तितकी आर्द्रता ठेवता येते. बाळ कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून दूर राहाते.

Web Title: satara news less incubator