वाद्यांच्या गजरात एकमेकींना शिव्यांची लाखोली 

रमेश धायगुडे
शनिवार, 29 जुलै 2017

लोणंद - खंडाळा तालुक्‍यातील सुखेड व बोरी गावांदरम्यान नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही गावांतील महिलांनी गावाच्या मध्यातून वाहणाऱ्या ओढ्याकाठी येऊन वाद्याच्या गजरात हातवारे करत एकमेकींना शिव्या देण्याचा बोरीचा बार यंदाही प्रथेप्रमाणे पाऊण तास भरला. यंदा पाऊस नसतानाही बोरीचा बार चांगलाच रंगला. या वेळी बार पाहण्यासाठी ओढ्याच्या दोन्ही तिरांवर व ओढ्यात महिला, नागरिकांनी गर्दी केली होती. 

लोणंद - खंडाळा तालुक्‍यातील सुखेड व बोरी गावांदरम्यान नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही गावांतील महिलांनी गावाच्या मध्यातून वाहणाऱ्या ओढ्याकाठी येऊन वाद्याच्या गजरात हातवारे करत एकमेकींना शिव्या देण्याचा बोरीचा बार यंदाही प्रथेप्रमाणे पाऊण तास भरला. यंदा पाऊस नसतानाही बोरीचा बार चांगलाच रंगला. या वेळी बार पाहण्यासाठी ओढ्याच्या दोन्ही तिरांवर व ओढ्यात महिला, नागरिकांनी गर्दी केली होती. 

नागपंचमीचा दुसरा दिवस उजाडला, की तालुक्‍यातील महिला व नागरिकांना बोरीच्या बाराची आस लागते. त्यानुसार आज सकाळपासून बार पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील महिला व नागरिक वाहनांतून सुखेडच्या माळावर दाखल होत होते. दोन्ही गावांतील महिला ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन तुतारी, डफडे, पिपाणी आदी वाद्यांच्या गजरात झिम्मा- फुगड्या खेळत ओढ्याकाठी दाखल झाल्या. सव्वाबारा वाजता बार सुरू झाला. पहिल्या दहा मिनिटांनंतर पोलिसांनी सर्व वाद्य बंद करून ओढ्याच्या मध्ये उतरून दोन्हीकडील महिलांना मागे सारले. त्यानंतर पावणेएक वाजता पाऊण तासाने बार संपला. या वेळी बार घालण्यासाठी ओढ्याच्या दोन्ही तिरावर हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. यावर्षी पाऊस नसल्यामुळे बार भरणारा ओढा कोरडा ठणठणीत असतानाही दोन्ही गावांतील महिलांनी आपला उत्साह तूसभरही कमी होऊन न देता जोशात बार घालून बार घालण्याचा आनंद लुटला. बार घालण्यासाठी तरुण मुली, महिला व वृद्ध महिलाही सहभागी झाल्या होत्या. बार घालणाऱ्या महिला हातवारे करत एकमेकींना शिव्या- शाप देत होत्या, तसेच एकमेकींना खांद्यावर उचलून घेऊन एकमेकींकडे त्वेषाने बघत हुर्रेचा नाराही देत होत्या. पाऊण तासानंतर बार संपला. त्या वेळी दोन्ही गावांतील महिला आपापल्या गावात जाऊन ग्रामदैवतेसमोर पारंपरिक खेळात रंगून गेल्या. 

लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी सातारा मुख्यालयातून महिला पोलिस कर्मचारी व अन्य पोलिस ठाण्यातून महिला व पुरुष कर्मचारी बोलावून चोख बंदोबस्त ठेवला होता. यानिमित्ताने बोरी येथील अमरदीप नेहरू युवा क्रीडा मंडळातर्फे आयोजित केलेल्या दोन दिवसीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेला मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व स्थानिक संघांनी हजेरी लावली होती. 

नव्या पिढीवर अनिष्ट परिणाम नाही 
बोरीच्या बाराची प्रथा नेमकी कधी सुरू झाली, याबाबत नेमकेपणाने दोन्ही गावांतील कोणीच काहीच सांगता येत नाही. मात्र, नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी महिलांनी एकत्र येऊन खेळावयाचा हा एक खेळ असल्याचे दोन्ही गावांतील महिला व नागरिकांचे म्हणणे आहे. हातवारे करत एकमेकींना उखाण्यातून शिव्या- शाप देताना महिला नेमक्‍या कोणत्या शिव्या देतात, हे समजून येत नाही. केवळ गोंगाटच कानी येतो. त्यामुळे त्याचा कोणता अनिष्ट परिणाम नव्या पिढीवर होत नाही. त्यामुळे ही परंपरा दोन्ही गावांतील महिला व नागरिक अत्यंत श्रद्धेने गेली अनेक वर्षे जपत आहेत. 

Web Title: satara news lonand