‘महावितरण’ची वसुली मोहीम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

सातारा - वारंवार आवाहन करूनही वीज बिल न भरणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई ‘महावितरण’ने सुरू केली आहे. घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडे थकीत रक्कम न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

सातारा - वारंवार आवाहन करूनही वीज बिल न भरणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई ‘महावितरण’ने सुरू केली आहे. घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडे थकीत रक्कम न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

जिल्ह्यात सद्य:स्थितीत घरगुती, वाणिज्य तसेच औद्योगिक वर्गवारीतील एक लाख ९६ हजार ५४६ वीज ग्राहकांकडे १९ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यात एक लाख ७७ हजार ८३८ घरगुती ग्राहकांकडे १३ कोटी ८७ लाख, वाणिज्यिक १६ हजार ६५९ ग्राहकांकडे चार कोटी ५६ लाख, तर दोन हजार ४९ औद्योगिक ग्राहकांकडे एक कोटी १९ लाख रुपयांची थकबाकी आहे. दिलेल्या मुदतीत वीज बिलांचा भरणा न केल्याने थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याने या थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एक लाख ४९ हजार १६९ कृषी पंपधारकांकडे वीज बिलांची २१६ कोटी सात लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यांनाही वीज बिल भरण्याची विनंती ‘महावितरण’कडून करण्यात येत आहे. त्याशिवाय सार्वजनिक पाणीपुरवठा वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे सहा कोटी ५८ लाखांची थकबाकी आहे.

‘महावितरण’च्या संबंधित कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झाली आहेत. त्याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिकृत केंद्र, वेबसाइट, ऑनलाइन बिल भरा
चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीज बिल भरणा केंद्रांसह www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल ॲपद्वारे ‘ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे. ग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरित भरणा करावा आणि वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.

Web Title: satara news mahavitaran recovery campaign