‘महावितरण’चे एसएमएस आता मराठीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

वीज बिलांसह देणार सेवेसंबंधीची माहिती; ऑनलाइन कामकाजावर भर 

सातारा - महावितरणच्या प्रणालीमध्ये मोबाईल क्रमांक नोंदविलेल्या वीज ग्राहकांना वीज बिलांसह इतर वीज सेवेसंबंधीची माहिती एसएमएसद्वारे आता मराठीतही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वीज बिलांसह देणार सेवेसंबंधीची माहिती; ऑनलाइन कामकाजावर भर 

सातारा - महावितरणच्या प्रणालीमध्ये मोबाईल क्रमांक नोंदविलेल्या वीज ग्राहकांना वीज बिलांसह इतर वीज सेवेसंबंधीची माहिती एसएमएसद्वारे आता मराठीतही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महावितरणने जास्तीत जास्त कामकाज ऑनलाइन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचा एक भाग म्हणून ग्राहकांना आपल्या तक्रारी व वीज बिलासंबंधित माहिती घरबसल्या मिळण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. महावितरणच्या वतीने मोबाईल क्रमांक नोंदवलेल्या ग्राहकांना वीज बिल व इतर सेवासंबंधीची माहिती एसएमएसद्वारे कळविली जाते. आतापर्यंत केवळ इंग्रजी भाषेतच ही माहिती दिली जात होती. त्यामुळे इंग्रजीची माहिती नसलेल्या विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकाला या सेवेचा फायदा घेता येत नव्हता.

ग्रामीण भागातील वीज ग्राहकांच्या भाषेची अडचण लक्षात घेऊन वी वितरण विभागातर्फे एसएमएस सुविधा मराठीतून देण्याचा विचार सुरू होता. तांत्रिक सुधारणा करून महावितरणने आता ही त्रुटीही भरून काढली आहे. आता मराठी भाषेतही एसएमएस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्राहकांचे वीज बिल तयार होताच ग्राहकाने किती वीज वापरली, मीटर रीडिंग, एकूण वीज बिल, सध्याचे रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख, देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा खंडित ठेवण्याची वेळ अशा प्रकारची माहिती वीजग्राहकांना मराठीतून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

त्याचबरोबर वीजपुरवठा खंडित झाल्यास अथवा यंत्रणेत बिघाड झाल्यास संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा कधी सुरू होणार आहे, त्याची माहितीही एसएमएसद्वारे मराठीत तातडीने मिळणार आहे. ही सुविधा मिळण्यासाठी वीज ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदविणे आवश्‍यक आहे. ही सुविधा मिळण्यासाठी ग्राहकांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावरून मराठी भाषेसाठी MLANG टाइप करून स्पेस देऊन आपला बारा आकडी ग्राहक क्रमांक टाकावा, त्यानंतर स्पेस देऊन १ क्रमांक टाकून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर एसएमएस पाठवायचा आहे. इंग्रजी भाषेसाठी MLANG टाइप करून स्पेस देऊन आपला बारा आकडी ग्राहक क्रमांक टाकावा, त्यानंतर स्पेस देऊन २ क्रमांक टाकून ९२२५५९२२५५ या क्रमांकावर एसएमएस पाठवायचा आहे.

बारामती परिमंडलात २० लाख ग्राहकांची नोंदणी
बारामती परिमंडलातील २० लाख चार हजार २८० ग्राहकांनी महावितरणकडे आपला मोबाईल क्रमांक नोंदवला आहे. यात सातारा मंडलातील सात लाख ९४ हजार ९९ वीज ग्राहकांचा समावेश आहे. विजेसंबंधीच्या सेवांची माहिती मोबाईलवर मिळवण्यासाठी ग्राहकांनी आपला क्रमांक १८००-२००-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर अथवा जवळच्या शाखा किंवा उपविभाग कार्यालयात नोंदवावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: satara news mahavitaran sms in marathi